Smita Jaykar : ते एकमेकांच्या खूप प्रेमात होते, सिनेमाच्या सेटवर…सलमान आणि ऐश्वर्याबद्दल मराठी अभिनेत्रीनं सगळंच सांगितलं
Smita Jaykar On Salman Khan : मराठी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमात काम केलेलं. आता एका मुलाखतीत स्मिता यांनी ऐश्वर्या आणि सलमानबद्दल भाष्य केलंय.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रेमकथा अपूर्ण राहिली असली तरी, बॉलिवूडमध्ये वेळोवेळी त्यांच्या अफेअरची चर्चा होत असते. वृत्तानुसार, ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले. आता, चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास अनेक उलटल्यानंतर, त्याच चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
काय म्हणाल्या स्मिता जयकर?
नुकत्याच एका मुलाखतीत स्मिता जयकर म्हणाल्या की, ‘ते एकमेकांच्या खूप प्रेमात होते. ऐश्वर्या त्यावेळेस खूप सुंदर दिसायची आणि हे सिनेमासाठीही खूप फायदेशीर ठरलं. मला प्रेमात असलेली लोक खूप आवडतात. सिनेमाच्या सेटवर बाकीचे सर्व खूप लवकर यायचे. पण, सलमान आणि ऐश्वर्या खूप उशिरा यायचे. एकाच छत्रीतून एकत्र यायचे, सेटवर आपली वाट बघतायत, याबद्दल त्यांना काहीच नसायचं. पण, ते प्रेमात असल्यामुळे चालून जायचं.’
यापूर्वीही ‘फिल्म मंत्रा’ला दिलेल्या मुलाखतीत स्मिता सलमानबद्दल बोलताना म्हणालेल्या की, ‘खूप खोडकर होता, पण त्याचबरोबर खूप दयाळू आणि मोठ्या मनाचा माणूस होता. आम्ही सलमानला सेटवर कधीही रागावलेलं पाहिलं नाही. लोक चित्रपट कलाकारांबद्दल गोष्टी रंगवून सांगतात. ऐश्वर्यासुद्धा खूप साधी आणि जमिनीवर पाय असलेली होती. ती मेकअपशिवायही सुंदर दिसायची.’
ब्रेकअपनंतर ऐश्वर्यानं सलमानवर शारीरिक छळ आणि मारहाणीचा आरोप केला. २००२ मध्ये ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली, ‘ब्रेकअपनंतर सलमान मला फोन करून काहीही बरळायचा. माझे सहकलाकारांसोबत अफेअर्स असल्याचा त्याला संशय होता. अभिषेक बच्चनपासून ते शाहरुख खानपर्यंत सर्वांशी माझं नाव जोडलं गेलं. असेही काही प्रसंग होते, जेव्हा सलमाननं मला मारहाण केली. पण माझ्या शरीरावर एकही निशाणी नव्हती. जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात मी कामावर गेले.’
दरम्यान, १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. अंदाजे ५१ कोटी रुपयांची कमाई करून तो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले.