Rahul Gandhi : आधी हिमाचल प्रदेश सुधारा आणि मग… लोकप्रिय गायिकेचा राहुल गांधींना टोला
Singer On Rahul Gandhi : गायिका सोना मोहपात्रानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे आणि हिमाचल प्रदेशातील नद्या व पर्वतांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

दिल्लीतील इंडिया ब्लॉक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, गायिका सोना मोहपात्रानं राहुल गांधींवर टीका केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लोकशाही सुधारण्याच्या राहुल गांधींच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सोनानं काँग्रेस पक्षाला आधी हिमाचल प्रदेश राज्याची सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे.
सोना म्हणाली की, देशाच्या लोकशाहीची चिंता करण्यापूर्वी, काँग्रेस पक्षानं त्यांच्या अखत्यारीत असलेल्या हिमाचल प्रदेशच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हिमाचलच्या डोंगररांगांमध्ये पसरलेला कचरा आणि प्रदूषित नद्यांचा मुद्दा उपस्थित करत, अभिनेत्रीनं विचारलं की, जेव्हा राज्यालाच सुधारणेची गरज आहे, तेव्हा काँग्रेस पक्ष देशाला उत्तम शासन देण्याचा दावा कसा करू शकतो.
सोनाचा राहुल गांधींना थेट टोला
सोना राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाली की, जर काँग्रेस पक्षाला देशातील लोकांचा पाठिंबा आणि विश्वास हवा असेल, तर त्यांनी आधी आपलं शासन सिद्ध केलं पाहिजे. हिमाचलची सुंदर खोरी, पर्वत आणि नद्या ही त्याची ओळख आहे. अशा परिस्थितीत, कचरा आणि प्रदूषणाच्या समस्येबद्दल प्रश्न उपस्थित होतात.
‘प्रिय राहुल गांधी, लोकशाही सुधारण्याआधी, तुम्ही आधी हिमाचल प्रदेश सुधारू शकता का? मी ९ वर्षांनंतर येथे परत आले आहे आणि कचऱ्याचे ढीग आणि घाणेरड्या नद्या पाहून मला धक्का बसला आहे. केवळ मागण्या करू नका, लोकांच्या आदरास पात्र व्हा. ज्ञानेश कुमार जातील. हे सरकार जाईल. मग लोकशाहीच्या दुरुस्तीला सुरुवात होईल.’
सोनाच्या वक्तव्यावर सोशल मीडिया युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने म्हटलं की, ‘राहुल गांधींकडे उत्तम पर्याय आहेत, हे सिद्ध करण्यासाठी अनेक संधी आहेत. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळला आदर्श राज्ये बनवा आणि ते जनतेच्या मतास पात्र आहेत हे सिद्ध करा. आपली क्षमता दाखवण्यासाठी ते यापैकी एका राज्याचे मुख्यमंत्री झाले तर ते आणखी चांगलं होईल.’ दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, ‘तुमची मागणी योग्य आहे, पण तुलना नाही!’