Sonali Kulkarni : त्या अभिनेत्यानं मला अयोग्यरित्या स्पर्श केला अन्…सोनाली कुलकर्णीनं सांगितला प्रसंग
Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीनं नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्याचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं चित्रपटसृष्टीतील काही कटू अनुभवांबद्दल भाष्य केलं आहे. एका सहकलाकारानं तिला अयोग्य पद्धतीनं स्पर्श केल्याचा प्रसंग आणि एका दिग्दर्शकानं चित्रपटाची कथा ऐकवण्याच्या निमित्तानं केलेली विचित्र मागणी, याबद्दल सोनालीनं नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं आहे.
सोनाली कुलकर्णीनं सांगितला प्रसंग
चित्रपटाच्या सेटवर काम करताना कलाकारांना अनेक प्रकारच्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं. काही वेळा सहकलाकारांकडून होणारे अयोग्य वर्तनही सहन करावं लागतं. मात्र, अशा प्रसंगांमध्ये गप्प बसण्याऐवजी आपली भूमिका स्पष्टपणे मांडणं महत्त्वाचं असल्याचं सोनाली कुलकर्णीनं सांगितलं.
चित्रपट सेटवर होणाऱ्या अयोग्य वर्तणुकीबद्दल बोलताना, सोनाली कुलकर्णीनं सांगितलं की, तिला अशा काही सहकलाकारांचा सामना करावा लागला आहे ज्यांनी वैयक्तिक सीमांचं उल्लंघन केलं होतं. अभिनेत्रीनं सांगितलं की, गप्प बसण्याऐवजी तिनं त्या परिस्थितीचा सामना करण्याचं ठरवलं. ‘मी अशा सहकलाकारांना पाहिलं आहे, ज्यांनी अयोग्य स्पर्श केला आहे. अशा वेळी माझ्याकडे त्यांना ठामपणे सांगण्याचं धैर्य होतं, ‘काका, तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे, तुम्ही असं वागू शकत नाही’ असं सोनाली म्हणाली. त्या अभिनेत्यानं तिची माफीसुद्धा मागितली, असं सोनालीनं सांगितलं.
‘मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनी माझी मनापासून माफीसुद्धा मागितली. त्यामुळे, मला कधीही असं वाटलं नाही की, मी हे प्रकरण सार्वजनिक करून गोंधळ निर्माण करावा. पण त्यांना तो धडा मिळाला जो त्यांना मिळायला हवा होता. स्त्रियांनी स्वतःच्या सीमा निश्चित करायला शिकलं पाहिजे आणि जेव्हा एखादी गोष्ट त्यांना अस्वस्थ करते, तेव्हा त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.’ स्वतःच्या बाजूनं नेहमी ठाम उभं राहण्यामागचं कारण स्पष्ट करताना सोनाली म्हणाली की, गप्प राहिल्यामुळे अशा प्रकारच्या वर्तणुकीला प्रोत्साहन मिळू शकतं. ‘झूम‘ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली कुलकर्णी बोलत होती.