मीच का? मला नाही शोभणार हे..; सलमान खानसोबत काम करण्याविषयी सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली..

Sonali Kulkarni: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'भारत' या चित्रपटातील भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सुरुवातीला सलमान खानच्या आईची भूमिका साकारण्यास तिचा नकार होता.

मीच का? मला नाही शोभणार हे..; सलमान खानसोबत काम करण्याविषयी सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली..
Sonali Kulkarni and Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 01, 2026 | 10:48 AM

Sonali Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनय कारकिर्दीत मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ या चित्रपटात तिने सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. मात्र, ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी सोनाली स्वतः या व्यक्तिरेखेबाबत साशंक होती. विशेष म्हणजे, ती सलमान खानपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे पडद्यावर त्याची आई साकारणं सुरुवातीला सोनालीला योग्य वाटत नव्हतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या भूमिकेमागची संपूर्ण कहाणी सांगितली. ‘भारत’मधल्या भूमिकेची ऑफर मिळाल्यानंतर सोनालीने सुरुवातीला ही व्यक्तिरेखा तिला योग्य वाटत नसल्याचं सांगितलं होतं.

सोनालीने दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्याकडे या भूमिकेसाठी इतर अभिनेत्रींची नावंही सुचवली होती. एखादी व्यक्तिरेखा साकारताना कलाकाराने त्या भूमिकेसाठी योग्य दिसणंही महत्त्वाचं असतं, असं तिचं मत होतं. त्यामुळे सलमान खानच्या आईची भूमिका स्वीकारण्याबाबत ती सुरुवातीला उत्सुक नव्हती.

Loading...

मात्र, सोनाली कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या भूमिकेला घाबरणाऱ्या अभिनेत्री नाही. तिने तिच्या कारकिर्दीतील वेगवेगळ्या भूमिका आठवत सांगितलं की, ‘चेलुवी’मध्ये तिने फुलांच्या झाडात रूपांतर होणाऱ्या मुलीची भूमिका केली होती, तर ‘दायरा’मध्ये मिशी असलेल्या पुरुषाची व्यक्तिरेखाही साकारली होती. त्यामुळे आईची भूमिका करणं ही समस्या नव्हती; या विशिष्ट भूमिकेसाठी आपलं वय आणि लूक योग्य वाटत नसल्याने ती साशंक होती, असं तिने स्पष्ट केलं.

‘भारत’च्या कथेत फ्लॅशबॅकचा मोठा भाग असल्याचं अली अब्बास जफर यांनी सोनालीला समजावून सांगितलं. सलमानच्या व्यक्तिरेखेचा बालपणापासूनचा प्रवास या फ्लॅशबॅकमधून महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या भूमिकेचं कथानकातील महत्त्व लक्षात आल्यानंतर सोनालीने निर्णय बदलला आणि ही भूमिका आव्हान म्हणून स्वीकारली. या भूमिकेला होकार देण्यामागे आणखी एक कारण होतं, ते म्हणजे सलमान खानसोबत काम करण्याची संधी. ‘भारत’पूर्वी सोनाली आणि सलमान यांनी एकत्र काम केलं नव्हतं. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याने सोनालीला उत्सुकता होती. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग झाल्याचंही तिने सांगितलं. सलमान लोकांशी ज्या पद्धतीने वागतो, त्यातून बरंच काही शिकता येतं, असं सोनालीने नमूद केलं.

‘भारत’च्या सेटवरील अनुभव सांगताना सोनालीने कतरिना कैफच्या मेहनतीचंही कौतुक केलं. डान्स नंबरसाठी ती ज्या पद्धतीने रिहर्सल करत होती, ते पाहून कामाप्रती तिचं समर्पण जाणवल्याचं सोनालीने सांगितलं. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भारत’मध्ये सलमान खान, कतरिना कैफ, सुनील ग्रोव्हर, दिशा पटानी आणि जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us