
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं रविवारी 13 जुलै रोजी निधन झालं. पद्मश्री पुरस्कारप्राप्त राव यांनी तेलुगू, हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये तब्बल 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. रविवारी सकाळी हैदराबादमधील ज्युबिली हिल्स परिसरातील राव यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. सेलिब्रिटी महेश बाबू, पवन कल्याण, प्रकाश राज, चिरंजीवी, एस. एस. राजामौली यांसारखे सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले होते. परंतु याचवेळी राव यांच्या निवासस्थानाबाहेर एक घटना अशी घडली, ज्याच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे पहिल्यांदाच संतापलेले दिसून आले. त्यांचा असा राग याआधी नेटकऱ्यांनी कधीच पाहिला नव्हता.
राजामौली हे नेहमीच शांत आणि संयमाने वागताना दिसून येतात. परंतु कोटा श्रीनिवास राव यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर तिथून निघताना एका व्यक्तीच्या वागण्यावरून ते प्रचंड चिडले होते. ते इतके चिडले की त्यांनी थेट त्या व्यक्तीला ढकललं आणि नंतर गाडीमध्ये जाऊन बसले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. राजामौली त्यांच्या गाडीच्या दिशेने चालत होते, तेव्हा एक चाहता सतत त्यांच्यासमोर सेल्फी घेण्यासाठी येतो. हातात मोबाइल घेऊन तो त्यांच्या मागे-मागे जातो आणि परवानगीशिवाय त्यांच्या तोंडासमोर फोन धरतो. सुरुवातीला राजामौली शांततेने नकार देतात, पण नंतर अति झाल्यावर ते त्याला ढकलतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर संतापलेले हावभाव स्पष्ट दिसून येतात.
राजामौली यांना त्यांचे सहकारी नेहमीच ‘कॅप्टन कूल’ म्हणतात. परंतु यावेळी पहिल्यांदाच ते इतके चिडताना दिसले. त्यामागचं कारणही ततसंच होतं. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजामौली हे कलाविश्वातील एका दिग्गज कलाकाराच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. अशा दु:खाच्या परिस्थितीतही एखादी व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी अडून बसल्याने त्यांच्या संयमाचा बांध सुटला. ‘कुठे कसं वागायचं, याचं भान चाहत्यांनी राखणं खूप गरजेचं आहे’, असं एकाने म्हटलं. तर ‘अंत्यविधीला अशा पद्धतीने सेल्फीसाठी मागे लागणं योग्य नाही’, असं दुसऱ्याने लिहिलंय.