श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, या दिवशी होणार प्रदर्शित
श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. 'स्त्री 3' चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर. या दिवशी होणार रिलीज? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडमधील लोकप्रिय हॉरर-कॉमेडी फ्रँचायझी ‘स्त्री’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘स्त्री 3’ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून हा चित्रपट 2028 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता दिनेश विजान यांनी नुकतीच ‘स्त्री 3’च्या रिलीजबाबत मोठी अपडेट दिली. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा आपल्या भूमिकेत दिसणार आहे.
दिनेश विजान आणि राजकुमार राव नुकतेच FICCI Frames या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ‘स्त्री’ फ्रँचायझीच्या यशाबद्दल आणि आगामी चित्रपटाबद्दल चर्चा केली. दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘स्त्री 3’ची स्क्रिप्ट नुकतीच पूर्ण केल्याचे दिनेश विजान यांनी सांगितले.
2028 मध्ये ‘स्त्री 3’चा धमाका
दिनेश विजान यांनी सांगितले की, ‘स्त्री 3’ 2028 मध्ये येईल. मी यापेक्षा जास्त काही सांगितले तर अमर कौशिक माझ्यावर नाराज होतील, कारण त्यांनी नुकतीच स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. त्यांना वाटते की मी खूप जास्त स्पॉयलर देतो.
पुढे ते म्हणाले की, प्रेक्षकांना ‘स्त्री’ फ्रँचायझीमध्ये आवडलेल्या सर्व गोष्टी आगामी भागात पाहायला मिळतील. मात्र, या चित्रपटाची कथा नेमकी कुठून सुरू होईल आणि कुठे संपेल, हे मोठे सरप्राइज असणार आहे. त्यामुळे 2028 मध्ये स्वातंत्र्यदिन किंवा ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास भेट ठरू शकतो.
राजकुमार रावनेही सांगितला ‘स्त्री’चा अनुभव
राजकुमार रावनेही ‘स्त्री’ फ्रँचायझीसोबतचा आपला अनुभव शेअर केला. सुरुवातीला एका स्वतंत्र आणि कमी बजेटच्या चित्रपटापासून या फ्रँचायझीची सुरुवात झाली होती. मात्र, दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या कथाकथनावर आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सर्वांचा पूर्ण विश्वास होता असे राजकुमारने सांगितले.
सेटवर सर्वजण मित्रांसारखे एकत्र काम करत होते. मजा-मस्ती करत आणि एकमेकांच्या सहकार्याने हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम पडद्यावरही दिसून आला आणि ‘स्त्री 2’मध्येही हीच ऊर्जा कायम राहिली असे राजकुमारने नमूद केले.
‘स्त्री’ फ्रँचायझीचा प्रवास
2018 मध्ये ‘स्त्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तर पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते.
