
मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी जोडीदाराकडून घटस्फोट घेत नात्याचा अंत केला. पण आता ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, तिने वयाच्या १८ व्या वर्षी पतीसोबत घटस्पोट घेण्याचा निर्णय घेतला. सध्या ज्या गायिकेच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून गायिका सुनिधी चौहान आहे. सुनिधी हिने अनेक प्रसिद्ध गाण्यांना स्वतःचा आवज दिला आहे. फक्त हिंदी नाही तर सुनिधी हिने मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगु, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
सुनिधी हिला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र अनेक संकटांचा सामना करावा लागला. वयाच्या १८ व्या वर्षी सुनिधी हिने २००२ मध्ये अभिनेता बॉबी खान याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं एक वर्ष देखील टिकलं नाही. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुनिधी हिने अनेक गोष्टींची खुलासा केला आहे.
सुनिधी म्हणाली, ‘माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. पण झालेल्या चुकांमुळे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकली. त्यामुळे आयुष्यात केलेल्या चुकांची मी ऋणी आहे. जर तेव्हा काही चुका झाल्या नसत्या तर आज माझं आयुष्य फार वेगळं आणि रटाळ असतं. मी आयुष्यातील चांगल्या गोष्टींना मुकले असते. कारण तुमच्या आयु्ष्यातील वाईट दिवस तुम्हाला एक नवी दिशा दाखवतात…’
पुढे सुनिधी म्हणाली, ‘सर्व काही सुरळीत सुरु होतं. मनात कुठेतरी आपण चुकीच्या ठिकाणी आहोत, याची जाणीव होत होती. चुकीच्या जागी जास्त काळ राहू नये हे देखील मला माहिती होतं. मला त्यातून बाहेर पडायचं होतं. माझ्या आयुष्याबद्दल चर्चा रंगतात. पण माझ्या चुकांमुळे मी घडली आहे…’ असं देखील सुनिधी म्हणाली.
सुनिधी चौहान हिचं पहिलं लग्न प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक अहमद खान याचा भाऊ बॉबी खानसोबत झालं होतं. वर्षभरानंतर दोघांनी विभक्त होण्याा निर्णय घेतला. 9 वर्षांनंतर सुनिधी चौहान हिनेने संगीतकार हितेश सोनिकसोबत लग्न केलं. त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा देखील आहे. तिच्या मुलाचं नाव तेग असं आहे.
सुनिधी चौहान हिने 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मस्त’ सिनेमातून पार्श्वगायिका म्हणून स्वतःच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर सुनिधी हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सुनिधी हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर चित्रित केलेली तीन गाणी गायली. भागे रे मन, मेहबूब मेरे आणि साकी साकी या गाण्यांमुळे सुनिधी हिला एक नवी ओळख मिळाली. सुनिधी आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.