मोटी, म्हैस म्हणणाऱ्यांना स्वरा भास्करने दिलं असं उत्तर; थेट ब्लाऊजवरच..
'राइज अँड फॉल 2'मध्ये अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्याच खास अंदाजात एण्ट्री केली. यावेळी तिच्या ब्लाऊजवरील मजकुराने सर्वांचं लक्ष वेधलं. स्वराच्या ब्लाऊजवर 'मोटी' असं लिहिलं होतं.

अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा तिने सोशल मीडियावरील ट्रोलिंगला अनोख्या पद्धतीने उत्तर देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वीरेंद्र सेहवाग होस्ट करत असलेल्या ‘राइज अँड फॉल सिझन 2’ या रिअॅलिटी शोमध्ये स्वरा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. शोच्या प्रीमियरमध्ये तिच्या लूकपेक्षा तिच्या ब्लाऊजवर लिहिलेल्या एका शब्दाचीच सर्वाधिक चर्चा झाली. स्वराने यावेळी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. मात्र या साडीपेक्षा तिच्या ब्लाऊजने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ब्लाऊजवर ‘मोटी’ असं लिहिलं होतं. सोशल मीडियावर गेल्या काही वर्षांपासून तिच्या वजनावरून होणाऱ्या कमेंट्सना उत्तर म्हणून तिने हा लूक निवडल्याचं स्पष्ट केलं. वीरेंद्र सेहवागसोबतच्या संवादात तिने यामागचं कारण सांगितलं.
मुलगी राबियाच्या जन्मानंतर तिच्या शरीरात झालेल्या बदलांवर गेल्या तीन वर्षांपासून अनोळखी लोकांकडून सोशल मीडियावर सातत्याने कमेंट्स केल्या जात आहेत. तिच्या वजनावरून विविध अपमानास्पद शब्द वापरले गेले. त्यामुळे आता त्या शब्दांपासून दूर पळण्याऐवजी तेच शब्द स्वतःच्या पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय तिने घेतला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
स्वराने यापूर्वीही प्रसूतीनंतरच्या शरीरातील बदलांवरून महिलांना दिल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षांवर भाष्य केलं आहे. तिच्या मते, आई झाल्यानंतर प्रत्येक महिलेच्या शरीराचा प्रवास वेगळा असतो. त्यामुळे प्रसूतीनंतर लगेच पूर्वीसारखं शरीर मिळवण्याची अपेक्षा प्रत्येक महिलेकडून करणं योग्य नाही, असं तिने सोशल मीडिया पोस्टमधूनही म्हटलं होतं. दरम्यान, ‘राइज अँड फॉल 2’मध्ये सहभागी होण्याचा निर्णयही स्वरासाठी सहज नव्हता. तिची तीन वर्षांची मुलगी असल्याने शूटिंगदरम्यान जवळपास सहा आठवडे तिच्यापासून दूर राहावं लागणार आहे. मात्र आता हळूहळू कामाकडे परतण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं आहे.
यापूर्वी ती ‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. तीन महिन्यांचा कालावधी मोठा असल्याने तिने ‘बिग बॉस 20’ नाकारल्याचंही तिने सांगितलं होतं. ‘राइज अँड फॉल 2’मध्ये स्वरासोबत अनेक चर्चेत असलेले चेहरे सहभागी झाले आहेत. या शोचं सूत्रसंचालन माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग करत आहे. शोमध्ये रणनीती, स्पर्धा आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या सेलिब्रिटींमधील समीकरणांमुळे पुढील भागांमध्ये अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
