Sajid Khan: साजिद खानला Bigg Boss 16 मधून हटवणार? अनुराग ठाकूर यांना पत्र

अभिनेत्रींचा साजिदला वाढता विरोध; सलमान खान कोणता निर्णय घेणार?

Sajid Khan: साजिद खानला Bigg Boss 16 मधून हटवणार? अनुराग ठाकूर यांना पत्र
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 10, 2022 | 3:47 PM

मुंबई- दिग्दर्शक साजिद खानला (Sajid Khan) बिग बॉस 16 मध्ये (Bigg Boss 16) संधी दिल्याबद्दल सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत साजिदवर जवळपास 10 कलाकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. अशा व्यक्तीला एखाद्या रिॲलिटी शोमध्ये संधी कशी दिली जाऊ शकते, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी त्याच्याविरोधात पोस्ट लिहिली आणि राग व्यक्त केला. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मालिवाल (Swati Maliwal) यांनीसुद्धा बिग बॉसमधील साजिदच्या एण्ट्रीवरून प्रश्न उपस्थित केला आहे.

याप्रकरणी स्वाती यांनी भाजपचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे साजिदला शोमधून हटवण्याची मागणी केली आहे. ‘साजिद खानविरोधात 10 महिलांनी मी टू मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या सर्व तक्रारींवरून साजिदची घाणेरडी मानसिकता दिसून येते. अशा व्यक्तीला बिग बॉसमध्ये स्थान देण्यात आलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी अनुराग ठाकूरजी यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्राद्वारे साजिद खानला शोमधून हटवण्याची मागणी केली आहे’, असं ट्विट स्वाती यांनी केलं.

स्वाती मालिवाल यांचं ट्विट-

बॉलिवूडमध्ये काम करणारी इराणी अभिनेत्री मंदाना करिमी हिनेसुद्धा तीव्र संताप व्यक्त केला होता. “बॉलिवूडमध्ये महिलांसाठी आदर नाही हे स्पष्ट होतंय. त्यामुळे मी यापुढे इंडस्ट्रीत काम करणार नाही”, असं तिने जाहीर केलं होतं. मी टू मोहिमेअंतर्गत मंदानानेही साजिदवर शोषणाचे आरोप केले होते.

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी, गायिका सोना मोहपात्रा यांनीसुद्धा बिग बॉसमध्ये साजिद खानला स्थान दिल्याचा विरोध केला. तर दुसरीकडे गेल्या चार वर्षांपासून हाती काम नसल्याचं, साजिदने बिग बॉसच्या घरात येताच सांगितलं. स्वत:ला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी या शोची ऑफर स्वीकारली, असं तो म्हणाला.