Tanuj Mahashabde : तिचं लिव्हर ट्रान्सप्लांट…’तारक मेहता’ फेम अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ, व्यक्त केलं आईला गमावण्याचं दुःख
Tanuj Mahashabde : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम तनुज महाशब्देनं एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला असून आईच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत अय्यरची भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्दे हा देखील याच मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाला. मात्र, त्याच्या या यशस्वी प्रवासामागे मोठा संघर्ष आणि काही भावनिक आठवणी आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यानं आपल्या आईच्या आजारपणादरम्यान घडलेला प्रसंग सांगत मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांचे आभार मानले.
तनुजनं सांगितला कठीण काळ
तनुज म्हणाला की, ‘अभिनेता होण्याचं स्वप्न मी लहानपणीच पाहिलेलं. लहानपणापासून मी छोट्या-छोट्या नाटकात भूमिका करायचो, स्किट करायचो. मी आयुष्यात खूप स्ट्रगल केलं आहे. त्यासाठी आई वडिलांची साथ होती. आई मला काही वर्षांपूर्वी सोडून गेली. पण, तिच्या आशीर्वादानं माझा प्रवास सुरू आहे. पण, मला वाटतं की मी आता पर्यंत जे काम केलं आहे. ते आईच्या आशीर्वादानं लोकांना खूप आवडलंय, त्यामुळे ते उपकार मी कधीही विसरणार नाही. माझ्या या भूमिकेला त्यांनी एवढं मोठं केलं, मला साथ दिली.’
‘तिची वेळ आलेली त्यामुळे ती निघून गेली. पण, मला कधी कोणी तिच्याबद्दल विचारलं की, मला तिची खूप आठवण येते. आई म्हणजे आई. आई सारखं दुसरं कोणीच नाही. कधीच नाही! कितीपण मी मजा केली, नवीन घरात शिफ्ट झालो तेव्हा तिथे आईचा फोटो आधी लावला. कारण हे तिचं घर आहे माझं नाही. आईला आजारपण कसं आलं, हे मला माहित नाही. 10-12 वर्षे गेली. त्रास झाला, पण तो सावरण्यासारखा होता. आईला लिव्हर सिरॉसिस होता. आम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट करणार होतो, पण त्या आधी ती गेली.’ असं तनुज शेवटी म्हणाला.
अभिनेत्यानं याच मुलाखतीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या मालिकेचे निर्माते असित मोदी यांचेही खूप आभार मानले आहेत. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता बोलत होता.