हा तुम्हाला अपमान वाटत असेल तर…पैठणी साडीला बोल्ड ड्रेसमध्ये बदलल्यामुळे ट्रोल होणारी ‘तारिणी’ फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली

Taarini Fame Actress : 'तारिणी' फेम अभिनेत्री अश्विनी गोरलेला तिनं परिधान केलेल्या पैठणीच्या ड्रेसवरून ट्रोल करण्यात आलं. आता अभिनेत्रीनं तिची बाजू मांडली आहे.

हा तुम्हाला अपमान वाटत असेल तर...पैठणी साडीला बोल्ड ड्रेसमध्ये बदलल्यामुळे ट्रोल होणारी तारिणी फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली
| Updated on: Oct 28, 2026 | 4:17 PM

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात ‘तारिणी‘ फेम अश्विनी गोरलेनं पैठणीपासून शिवलेला बोल्ड ड्रेस परिधान केलेला. मात्र, त्यावरून अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत अश्विनीनं तिची बाजू मांडली असून काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. अश्विनी म्हणाली की, ‘महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या पैठणीचं स्थान माझ्यासाठी खूप खास आहे. पैठणी म्हणजे केवळ एक सुंदर साडी नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची, कलाकुसरीची आणि अनेक पिढ्यांनी जपलेल्या वारशाची ओळख आहे.’

अश्विनी गोरलेचं स्पष्टीकरण

Loading...

‘माझ्या लग्नात मी जी पैठणी नेसले होते, ती माझ्यासाठी केवळ एक साडी नव्हती. त्या साडीसोबत माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या दिवसाच्या, माझ्या लग्नाच्या आणि अनेक सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत. आजही त्या पैठणीचं माझ्या मनात एक वेगळंच स्थान आहे. त्यामुळे तिच्याशी जोडलेलं नातं माझ्यासाठी भावनिक आहे. मी त्याच पैठणीचा एका डिझायनरकडून ड्रेस तयार करून घेतला. माझ्या लग्नातील त्या खास आठवणींना एका नव्या रूपात सोबत घेऊन जाण्याची ती माझी कल्पना होती. पारंपरिक पोशाखातील सौंदर्य आणि आजच्या काळातील फॅशन यांचा एक वेगळा मेळ साधण्याचा माझा प्रयत्न होता. पण, चाहत्यांनी माझ्यावर टीका केली. पैठणीचा अपमान केला, असंही काहींनी म्हटलं. पण मला एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते, पैठणीचा सन्मान करण्याची एकच पद्धत असू शकते का? पैठणी साडी म्हणून नेसली, तरच तिचा सन्मान होतो आणि तिच्या प्रेरणेतून एखादा वेगळा पोशाख तयार केला, तर तो अपमान ठरतो का? माझ्या मते, एखाद्या परंपरेचा सन्मान करण्यामागे त्या व्यक्तीची भावना आणि हेतू समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.’

‘माझा उद्देश कधीही पैठणीची थट्टा करणं, तिचं महत्त्व कमी करणं किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनादर करणं हा नव्हता. उलट, माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या आठवणीला आधुनिक रूपात जपण्याची ती एक वैयक्तिक कल्पना होती. प्रत्येकाला माझी निवड आवडेलच, असं नाही. प्रत्येकाची सौंदर्यदृष्टी वेगळी असते आणि मतभेद असणं स्वाभाविक आहे. माझा पोशाख कोणाला आवडला नसेल, तर त्यांचं मत मांडण्याचा अधिकारही मी मान्य करते.’ ‘पण एखाद्या कलाकाराच्या कपड्यांवरून त्याच्या संस्कृतीप्रती असलेल्या प्रेमाचा किंवा आदराचा निर्णय घेणं योग्य ठरेल का?’ असा सवालही अश्विनीनं केला आहे.

‘माझ्या हेतूचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये, एवढंच मला वाटतं. माझ्या लग्नातील पैठणीशी जोडलेल्या आठवणी मी एका नव्या पोशाखातून जपण्याचा प्रयत्न केला.’ असंही अश्विनी शेवटी म्हणाली. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन‘ला दिलेल्या मुलाखतीत अश्विनी बोलत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us