शिंदेंच्या शिलेदाराची तक्रार, तटकरेंवर आरोप अन् कार्यकर्त्यांच्या टोकाच्या पावलाचा इशारा; रायगडमध्ये नेमकं चाललंय काय?
Raigad Politics News: रायगडमध्ये आरोप-प्रत्यारोपांमुळे रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली कैफियत मांडल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा महेंद्र थोरवे यांनी केल्याचे सांगितले जात आहे. तसेच आपल्याला संरक्षणाची गरज असल्याची भूमिकाही त्यांनी मांडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी थोरवे यांना काळजी करू नका, खंबीर राहा, मी तुमच्या सोबत आहे, असे सांगितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मध्यस्थी न झाल्यास कार्यकर्ते टोकाचे पाऊल उचलू शकतात, अशी भूमिकाही थोरवे यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे. महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील तटकरे यांना विश्वासघातकी नेता संबोधत ते केसाने गळा कापण्याचे काम करतात, असा आरोप थोरवे यांनी केला.
तसेच आपल्याला सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला. मी मरणाला घाबरत नाही. जशास तसे उत्तर देईन, असा इशाराही थोरवे यांनी दिला. महेंद्र थोरवे यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. सुनील तटकरे गेल्या ४५ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात कार्यरत असून त्यांच्यावर अद्याप एनसीदेखील दाखल नसल्याचा दावा घारे यांनी केला. सुनील तटकरे हे संयमी नेते असून त्यांनी कधीही कोणाबद्दल अपशब्द काढले नाहीत, असेही ते म्हणाले.
सुनील तटकरे यांच्यावर आमदार थोरवे यांनी सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करणे ही खेदाची बाब असल्याचे घारे यांनी सांगितले. थोरवे यांनी केलेल्या आरोपांची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्याचबरोबर थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या जशास तसे उत्तर देईन या इशाऱ्याचीही चौकशी करण्यात यावी, असे घारे म्हणाले. आमदार थोरवे यांना त्यांची कर्म झोप लागू देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस बंदोबस्तात फिरण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही सुधाकर घारे यांनी केली.
