
अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. ती सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत तिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता तनुश्री तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने एका दिग्दर्शकावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. या दिग्दर्शकाने तनुश्रीकडे अश्लील मागणी केल्याचं तिने म्हटलंय. “कपडे काढ आणि नाच..” असं म्हणत दिग्दर्शकाने गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. परंतु या मुलाखतीत तिने संबंधित दिग्दर्शकाच्या नावाचा मात्र खुलासा केला नाही.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ता म्हणाली, “एकतर तू इतका मोठा दिग्दर्शकसुद्धा नाही. मग इतक्या उद्धटपणे का बोलतो? कपडे काढ आणि नाच.. असं तो मला म्हणाला. त्या सीनमध्ये मला वरचं गाऊन जरासं खाली सरकवायचं होतं. हेच तो चांगल्या पद्धतीनेही सांगू शकले असते. तरीसुद्धा मी गप्प राहिले होते. त्या दिवसांत मी खूप शांत झाले होते. मी फक्त त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि गप्प बसले. तिथे उभ्या असलेल्या इतर कलाकारांनाही खूप वाईट वाटलं. सर्वांनाच ते चुकीचं वाटलं होतं. आता मी टू मोहिमेदरम्यान कोणी समोर येऊन बोललं नाही, पम त्यावेळी सर्वांनी माझी साथ दिली होती. म्हणून तो दिग्दर्शक नंतर गप्प बसला.”
“त्या सीनमध्ये माझा कॉस्च्युम थोडं अंगप्रदर्शन करणारं होतं. त्यातही मला पाण्यात नाचायला सांगितलं होतं. तो भसकन मला म्हणाला की, कपडे काढ आणि नाच. एखाद्या अभिनेत्रीसोबत किंवा मिस इंडियासोबत बोलायची ही पद्धत नव्हती. नंतर मीडियामध्ये मी त्याचं नाव न घेता जे घडलं ते सांगितलं, तेव्हा तो स्वत:हून येऊन स्पष्टीकरण देत होता. आजपर्यंत तो मुलाखती देतोय”, असं तनुश्रीने सांगितलं.
तनुश्री 2020 मध्ये ‘मी टू’ मोहिमेमुळे चर्चेत आली होती. तिने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. तिच्या या आरोपांमुळे इंडस्ट्रीत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. ही MeToo मोहीम त्यावेळी चांगलीच चर्चेत होती. कारण या मोहिमेची सुरुवात भारतात तनुश्रीच्या आरोपांनी झाली.