करुणा मुंडे यांना मोठा धक्का, धनंजय मुंडेंना दिलासा, न्यायालयात नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे, करुणा मुंडे यांनी दाखल केलेली तक्रार परळी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यानंतर आम्ही आता हाय कोर्टात जाणार आहोत, असं करुणा मुंडे यांच्या वकीलाने म्हटलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात करुणा मुंडे यांनी दाखल केलेली तक्रार परळी न्यायालयानं फेटाळली आहे. करुणा मुंडे यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने ही तक्रार दाखल केली होती. धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी आपल्या या तक्रारीमध्ये केला होता. या प्रकरणावर परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली, यावर करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब आणि वकिलांचा यूक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं ही तक्रार फेटाळून लावली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या वतीनं वकील अशोक कावडे यांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली.
या आधी देखील कृषी विभागाच्या खरेदीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदाराला दंड लावला होता. दरम्यान न्यायालयानं ही तक्रार फेटाळून लावल्यानंतर आता करुणा मुंडे यांच्या वकिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही आता या प्रकरणात हाय कोर्टात दाद मागणार आहोत, असं करुणा मुंडे यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांचा उल्लेख टाळल्याप्रकरणी करुणा मुंडे यांनी ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर करुणा शर्मा मुंडे यांची तक्रार परळी न्यायालयाने फेटाळली आहे.
दरम्यान दुसरीकडे महापालिका निवडणुकीवरून पुण्यातील अजित पवारांच्या राजकारणावर प्रश्न विचारताच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी चक्क हात जोडल्याचं पहायला मिळालं आहे. राजकारणा संदर्भात बोलण्याचे धनंजय मुंडे यांनी टाळले आहे. गेल्या वर्षभरात जे प्रारब्धात होते तेच घडलं. पण माझ्यावर आलेली संकट ओढवलेली नव्हती, तर जाणीवपूर्वक आलेली होती. वर्ष सरलं तशी संकट ही सरली. अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी पंढरपुरात दिली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं, त्यावेळी ते बोलत होते.
