मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बदललं नशीब; एका डायलॉगने बनला सर्वात खतरनाक खलनायक, कोण आहे तो?
मुंबईच्या लोकलमधून प्रवास करत असताना या अभिनेत्याचं बदललं नशीब. चित्रपटातील एका डायलॉगमुळे बनला सर्वात खतरनाक खलनायक. ओळखलं का?

सिनेमा क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या जवळपास प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं ते नायक बनण्याचं. मात्र, अनेकदा कलाकाराची ओळख त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्याच भूमिकेमुळे निर्माण होते. ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांचाही प्रवास असाच रंजक आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी नायकासोबतच खलनायकाच्या भूमिकाही साकारल्या. मात्र प्रेक्षकांच्या मनात त्यांची ओळख सर्वाधिक चर्चेत राहिली ती दमदार खलनायक म्हणून.
23 सप्टेंबर 1935 रोजी लाहोरमध्ये जन्मलेल्या प्रेम चोप्रा यांचे वडील रणबीर लाल चोप्रा हे एका कंपनीत अकाउंट ऑफिसर होते, तर आई रूपराणी चोप्रा गृहिणी होत्या. भारताच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब शिमल्याला आले. प्रेम चोप्रा यांचे बालपण आणि शिक्षण शिमल्यातच झाले.
मुंबईच्या लोकलमुळे बदललं आयुष्य
शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन ते मुंबईत आले. सुरुवातीचा काळ मात्र त्यांच्यासाठी संघर्षाचा होता. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी एका कंपनीच्या सर्क्युलेशन विभागात नोकरी केली. याच काळात लोकल ट्रेनमधील एका भेटीने त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.
प्रवासादरम्यान एका पंजाबी चित्रपटाच्या निर्मात्याच्या किंवा प्रॉडक्शन कंट्रोलरच्या नजरेस प्रेम चोप्रा पडले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन त्या व्यक्तीने त्यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का, असं विचारलं. प्रेम चोप्रांनी लगेच होकार दिला आणि त्यांच्यासोबत रंजीत स्टुडिओमध्ये गेले.
त्यानंतर 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चौधरी करनैल सिंह’ या पंजाबी चित्रपटातून त्यांना अभिनयाची संधी मिळाली. हा चित्रपट मोठा गाजला आणि त्याला पंजाबी भाषेतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. काही पंजाबी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या, मात्र त्यातील अनेक चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत.
या चित्रपटातून कारकिर्दीला मिळाली मोठी दिशा
यानंतर ‘शहीद’ या चित्रपटातील सुखदेवच्या भूमिकेने त्यांच्या कारकिर्दीला मोठी दिशा मिळाली. पुढे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा खलनायक इतका प्रभावी ठरला की काही काळ प्रेक्षक त्यांना पडद्यावरील भूमिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही घाबरत असत.
‘बॉबी’ चित्रपटातील त्यांचा ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपड़ा’ हा संवाद आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि लक्षात राहिलेल्या संवादांपैकी एक मानला जातो.
