थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला चित्रपट OTT वर येताच 4 दिवसांमध्ये ठरला टॉप, पाहण्यासाठी उडाली झुंबड
3 महिन्यांपूर्वी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला चित्रपट ओटीटीवर येताच चार दिवसांमध्ये ठरला टॉप. पाहण्यासाठी प्रेक्षकांची उडाली झुंबड. नेमकी कथा काय?

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक चित्रपटांना थिएटरनंतर पुन्हा एकदा प्रेक्षक मिळताना दिसत आहेत. सध्या असाच एक थिएटरमध्ये अपेक्षित यश न मिळालेला चित्रपट सध्या ओटीटीवर चांगलाच गाजताना दिसत आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीच्या ‘बेबी डू डाई डू’ या चित्रपटाला थिएटरमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हुमा कुरेशीची मुख्य भूमिका असलेला ‘बेबी डू डाई डू’ हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी समाधानकारक ठरली नाही. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट अपयशी ठरला. विशेष म्हणजे, समीक्षकांकडून चित्रपटाच्या कथानकाचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते.
आता हा चित्रपट 23 सप्टेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत तो टॉप-10 मध्ये पोहोचला आहे. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या टॉप-10 यादीत चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
‘बेबी डू डाई डू’ची कथा सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेली आहे. या चित्रपटात हुमा कुरेशीने एका महिला सीरियल किलरची भूमिका साकारली आहे. ती विशेषतः पुरुषांना आपले लक्ष्य बनवते. मात्र, ती पुरुषांनाच का लक्ष्य करते, यामागचे कारण चित्रपटाच्या कथेत दडलेले आहे. या भूमिकेची आणखी एक खासियत म्हणजे हुमा साकारत असलेले पात्र बोलू आणि ऐकू शकत नाही.
नचिकेत सामंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सलीम सिब्लिंग्स आणि पुणे 04 पिक्चर्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हुमा कुरेशीसोबत सिकंदर खेर आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
थिएटरमध्ये प्रेक्षकांनी पाठ फिरवलेल्या या चित्रपटाला आता ओटीटीवर मात्र चांगली पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे ‘बेबी डू डाई डू’ हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात लोक हा चित्रपट ओटीटीवर बघताना दिसत आहेत.
