हल्ल्यानंतर टायगर श्रॉफला ट्रोल करणाऱ्यांसाठी टीमने शेअर केला Video, नेमकं व्हिडीओमध्ये काय?

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. मात्र, त्यानंतर आता त्याच्या टीमने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केले आहे. काय आहे त्या व्हिडीओमध्ये?

हल्ल्यानंतर टायगर श्रॉफला ट्रोल करणाऱ्यांसाठी टीमने शेअर केला Video, नेमकं व्हिडीओमध्ये काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 22, 2026 | 2:20 PM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचच्या तपासात नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, दुखापतींबाबत सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर टायगरच्या टीमने व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सना उत्तर दिले आहे.

टायगर श्रॉफचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पहिल्या व्हिडिओमध्ये त्याच्या हातावर आणि शरीरावर पट्ट्या दिसत होत्या तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पट्ट्या नसल्याने त्याच्या दुखापतींबाबत नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. यानंतर टायगरच्या टीमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याच्या हातावर बारीक ठिपक्यांसारख्या जखमांच्या खुणा दिसत आहेत. या पोस्टसोबत टीमने ‘देव दयाळू आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.

Loading...

दोन महिलांमार्फत शस्त्रांची वाहतूक?

दरम्यान, मुंबई क्राइम ब्रँचच्या माहितीनुसार, आरोपी कुणालने राधा आणि बबीता या दोन महिलांना पैसे देऊन शस्त्रे मुंबईत पोहोचवण्यास सांगितले होते. कामाच्या निमित्ताने मुंबई फिरण्याचे आमिष दाखवून त्यांना या कामासाठी तयार करण्यात आल्याचा संशय आहे. शस्त्रे पोहोचवल्यानंतर या महिलांनी मुंबईतील काही ठिकाणी भेट दिल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाइल फोन फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे क्राइम ब्रँचची अँटी-एक्स्टॉर्शन सेल मोबाइलमधील डेटा पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासून त्यांचे संपर्क आणि गोळीबारापूर्वी व नंतर झालेल्या संभाषणांची माहिती मिळवली जात आहे. दिल्ली आणि सोनीपत येथून अटक केलेल्या चार आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकी घटना काय?

18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. फुटबॉल खेळून पुष्पा नरसी ग्राउंड येथून कारने जात असताना हा हल्ला झाला. या घटनेत टायगर श्रॉफ बचावला, मात्र त्याचा चालक फिरदौस गोळी लागल्याने जखमी झाला.

या प्रकरणात सुरुवातीला रेहान, फूल सिंह आणि ऋतिक कुमार या तिघांना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली आणि सोनीपत येथूनही आरोपींना अटक करण्यात आली. आता शस्त्रपुरवठा, हल्ल्याची पूर्वतयारी आणि या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींची भूमिका यांचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us