1980मध्ये एका गाण्याचे 3 व्हर्जन आलेले; हेमलता, मनोहर दास अन् रफींनीही गायलेलं, नेमकं कोणतं?
मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गाणी आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यांच्या अनेक गाण्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, रफी यांच्याशी संबंधित एका गाण्याची खास गोष्ट आहे? 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आप तो ऐसे ना थे' या चित्रपटातील एकच गाणं तीन वेगवेगळ्या गायकांनी गायलं होतं.

हिंदी चित्रपटसृष्टीत अशी अनेक गाणी आहेत, जी काळाच्या पुढे जाऊनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. काही गाणी त्यांच्या संगीतामुळे लक्षात राहतात, तर काही गाण्यांचे शब्द आणि गायकाचा आवाज थेट काळजाला भिडतो. मोहम्मद रफी यांची अशीच असंख्य गाणी आजही संगीतप्रेमी आवडीने ऐकतात. पण रफी यांच्या एका लोकप्रिय गाण्याबाबत तुम्हाला एक खास गोष्ट माहिती आहे का? एकाच गाण्याचे तीन वेगवेगळे व्हर्जन तीन गायकांनी गायले होते. विशेष म्हणजे, या तिन्ही व्हर्जनपुढे रफी यांची गायकी सर्वाधिक भाव खाऊन गेली.
कोणतं आहे हे गाजलेलं गाणं?
1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आप तो ऐसे ना थे’ या चित्रपटातील ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ हे ते गाणं आहे. या गाण्याचे तीन वेगवेगळे व्हर्जन तयार करण्यात आले होते. हेमलता, मनोहर दास आणि मोहम्मद रफी या तीन गायकांनी आपापल्या आवाजात हे गाणं गायलं. तिन्ही गायकांच्या आवाजातील या गाण्याची मांडणी वेगळी असली, तरी प्रत्येक गाण्याने आपली वेगळी छाप सोडली.
रंजीता, राज बब्बर आणि दीपक पराशर यांच्यावर चित्रित
या गाण्याचं पहिलं व्हर्जन गायिका हेमलता यांनी गायलं होतं. अभिनेत्री रंजीता यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. दुसऱ्या व्हर्जनला मनोहर दास यांनी आवाज दिला. हे गाणं अभिनेता राज बब्बर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं. तर तिसऱ्या व्हर्जनमध्ये स्वतः मोहम्मद रफी यांनी गाणं गायलं होतं. त्यांच्या आवाजातील ही व्हर्जन अभिनेता दीपक पराशर यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं.
रफींच्या आवाजातील व्हर्जनला सर्वाधिक पसंती
एकाच गाण्याची तीन व्हर्जन असली, तरी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गाण्यालाच सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. त्यांच्या आवाजातील भावपूर्ण गायकीमुळे हे गाणं आजही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरते. विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यूट्यूबवर रफी यांच्या आवाजातील या गाण्याला 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे तीन गायकांनी गायलेल्या या एकाच गाण्यात रफी यांच्या आवाजाची जादू आजही कायम असल्याचं दिसून येतं.