Vaishali Made : लेकीला 106 ताप, उपचारासाठी घरातल्यांकडे पैशांची भीक मागितली, पण…वैशाली माडेनं कठीण काळ

Vaishali Made : गायिका वैशाली माडेनं एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे. गायिकेच्या लेकीला 106 ताप होता, तरीही कुटुंबीयांनी उपचारासाठी मदत केली नाही.

Vaishali Made : लेकीला 106 ताप, उपचारासाठी घरातल्यांकडे पैशांची भीक मागितली, पण...वैशाली माडेनं कठीण काळ
| Updated on: Oct 24, 2026 | 12:52 PM

अनेक कलाकारांच्या आयुष्यात चढउतार येतात. हे चढउतार त्यांच्या आयुष्यतील टर्निंग पॉईंट ठरतात. त्याबद्दल काही कलाकार मोकळेपणानं भाष्य करतात. अशातच एका मुलाखतीत सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडेनंही तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे. वैशालीनं तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप यातना सहन केल्या आहेत. वैशाली माडे म्हणाली की, ‘माझी मुलगी साधारण एक वर्षाची होती तेव्हा तिला 106 ताप आला होता. तिच्या हॉस्पिटल खर्चासाठी माझ्याच घरात मला पैशांची भीक मागावी लागली होती. मी जे काही कमवत होते त्यावर माझा काहीच हक्क नव्हता. त्यामुळे मी पैशांची भीक मागितली आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मला त्यावेळी पैसे मिळाले नाहीत. त्यावर उत्तर मिळालं की, माझ्याकडे पैसे नाहीत तुला काय करायचंं ते कर. तिथून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 360 डिग्री आयुष्य बदललं. माणूस स्ट्रॉंग होतो आणि मग त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते ते इथे माझ्या आयुष्यात झालेलं.’

 

Loading...

‘त्यानंतर मी माझ्या बहिणीला फोन केला आणि तिला सांगितलं की, मुलीला ताप आला आहे आणि ती खूप खोकत आहे. माझ्याकडे रिक्षाला सुद्धा पैसे नाहीत, मला काहीच समजत नाहीये मी काय करू. ती माझी मानलेली बहीण होती. तिथे माझ्या रक्ताचं कोणीच नव्हतं. ती मला म्हणाली की तू टॅक्सी मध्ये बस आणि बांद्राला ये. तू इथे आलीस की, मी टॅक्सीवाल्याला पैसे देते. तिथून मी डॉक्टरकडे गेले. त्यांनी लगेच माझ्या मुलीला ऍडमिट करून घेतलं. तेव्हा डॉक्टर बोलेले की, आणखी थोडा उशीर झाला असता तर मुलीचा जीव वगैरे गेला असता.’

 

 

‘दुसऱ्या दिवशी पहाटे सा रे ग म चं शूटिंग होतं. घरच्यांना सांगून मी शूटिंगला गेले. जाणं गरजेचं होतं, म्हणून मी गेले. मी गाणं सादर करायला गेले, समोर बघते तर माझा नवरा समोर होता. मी इशाऱ्याने विचारलं, मुलगी कुठे आहे? त्यावर तो म्हणाला, हॉस्पिटलमध्ये आणि मी शूटिंग बघायला आलोय. मी गाणं संपवलं आणि त्याला भेटायला गेले. मी निर्मात्यांना विनवणी केली आणि हॉस्पिटलला गेले. त्या प्रसंगाने मी खूप बदलेले.’ असं वैशाली शेवटी म्हणाली. ‘अभिजात मराठी फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत वैशाली माडे बोलत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us