रश्मिकाला इटलीमध्ये का प्रपोज केलं नाही? विजय देवरकोंडाने सांगितलं कारण, ऐकून तुम्ही…
अभिनेता विजय देवरकोंडाने रश्मिका मंदानाला इटलीमध्ये का प्रपोज केलं नाही याचा खुलासा कॉफी विथ करणच्या 9 व्या सीझनमध्ये केला आहे. नेमकं काय होतं कारण? जाणून घ्या सविस्तर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रेमकहाणीबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आता ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या सीझनमध्ये विजयने रश्मिकाला प्रपोज करण्यामागची खास गोष्ट सांगितली आहे. रश्मिकाला आयुष्यभर लक्षात राहील असा प्रपोजलचा क्षण द्यायचा होता; मात्र इटलीमध्ये योग्य अंगठी न मिळाल्याने त्याचा मूळ प्लॅन पूर्ण होऊ शकला नाही असे विजयने सांगितले.
‘कॉफी विथ करण सीझन 9’च्या आगामी भागात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना एकत्र दिसणार आहेत. या शोमध्ये विजयने आपल्या प्रपोजलच्या नियोजनाबाबत खुलासा केला. तो सहसा अशा रोमँटिक गोष्टींचे विशेष नियोजन करत नसला, तरी रश्मिकाला प्रपोजलची एक सुंदर आठवण मिळावी, अशी त्याची इच्छा होती.
डिसेंबरमध्ये इटलीला गेले असताना त्याने रश्मिकाला प्रपोज करण्याचा विचार केला होता. मात्र, मनासारखी अंगठी मिळाली नाही आणि त्याचा हा प्लॅन प्रत्यक्षात येऊ शकला नाही. रश्मिकाला प्रपोजलची खास आठवण मिळावी, हीच आपली इच्छा असल्याचे विजयने सांगितले.
उदयपूरमध्ये मित्रांसमोर गुडघ्यावर बसून प्रपोज
विजयने पुढे सांगितले की, उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नसोहळ्याच्या पहिल्याच दिवशी, संगीत समारंभाच्या रात्री त्याने रश्मिकाला प्रपोज केले. लग्नाच्या कार्यक्रमांपूर्वीच प्रपोजल झाले होते, अशा चर्चांनाही त्याने या निमित्ताने स्पष्ट केले.
संगीत समारंभानंतर विजयने आपल्या सर्व मित्रांना एकत्र बोलावले. या खास क्षणी आपले जवळचे मित्र उपस्थित असावेत, अशी त्याची इच्छा होती. त्यानंतर तो गुडघ्यावर बसला आणि त्याने रश्मिकाला लग्नाची मागणी घातली. हा क्षण रश्मिकासाठी खास असावा आणि तिच्याकडून तो आनंद हिरावून घेतला जाऊ नये, अशी भावना विजयने व्यक्त केली.
26 फेब्रुवारी 2026 रोजी विवाहबंधनात अडकले
विजय देवेरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह केला. 22 फेब्रुवारी रोजी दोघांनी सोशल मीडियावरील स्वतंत्र स्टोरीजमधून लग्नाची घोषणा केली होती. चाहत्यांनी या जोडीला दिलेल्या ‘विरोश’ या नावानेच त्यांच्या विवाहसोहळ्याचे नाव ‘द वेडिंग ऑफ विरोश’ ठेवण्यात आले होते.
2018 मध्ये ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर विजय आणि रश्मिकाच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर 2019 मध्ये ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटातही ही जोडी एकत्र दिसली. त्यांच्या सार्वजनिक उपस्थिती, सोशल मीडिया पोस्ट आणि मुलाखतींमधील सूचक वक्तव्यांमुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल उत्सुकता वाढत गेली.
