
अभिनेते आणि निर्माते कृष्ण कुमार यांची मुलगी टिशा कुमारचं 18 जुलै रोजी निधन झालं. अवघ्या 21 वर्षीय टिशाची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. टिशा ही ‘टी-सीरिजचे’ गुलशन कुमार यांची पुतणी आहे. कृष्ण कुमार आणि गुलशन कुमार हे बंधू आहेत. गेल्या काही दिवसांपासून टिशावर जर्मनीत उपचार सुरू होते. तिथल्याच रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. खराब वातावरणामुळे टिशाचं पार्थिव भारतात आणण्यात अडचण निर्माण होत होती. अखेर आज (22 जुलै) तिचं पार्थिव मुंबईत आणलं असून त्यावर अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी टिशाला श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. यात अभिनेता विंदु दारा सिंग याचाही समावेश होता. मात्र विंदुचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून नेटकरी त्याला खूप ट्रोल करत आहेत.
या व्हिडीओमध्ये विंदु दारा सिंग हा एका व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकून चालत पुढे येत आहे. मात्र यावेळी तो हसताना दिसला. बाजूला असलेल्या व्यक्तीसोबत काहीतरी बोलत आणि हसत तो चालत होता. हे पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी विंदुवर बरीच टीका केली. ‘तो दारू प्यायलाय की खरंच हसतोय?’, असा प्रश्न एकाने विचारला. तर दुसऱ्याने म्हटलंय ‘हा तर हसत येतोय, लग्नाला आल्यासारखा.’ विंदुच्या या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी खूप ट्रोलिंग केली आहे.
शुक्रवारी ‘टी-सीरिज’कडून टिशाच्या निधनाची माहिती देण्यात आली. ‘कृष्ण कुमार यांची मुलगी टिशा कुमार हिचं काल निधन झालं. ती कर्करोगाशी झुंज देत होती. कुटुंबीयांसाठी ही फार दु:खाची वेळ असून तुम्ही आमच्या खासगी आयुष्याचा आदर कराल अशी विनंती आहे’, असं निवेदन टी-सीरिजकडून देण्यात आलं होतं. दोन महिन्यांतच टिशाचा वाढदिवस येणार होता. मात्र त्यापूर्वीच तिची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली.
टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे छोटे बंधू कृष्ण कुमार आहेत. त्यांनी फक्त पाच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. मात्र 1995 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘बेवफा सनम’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील गाणीसुद्धा गाजली होती. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ हे गाणं याच चित्रपटातील होतं. टिशा ही कृष्ण कुमार आणि त्यांची पत्नी तान्या सिंह यांची मुलगी होती. तान्यासुद्धा गायिका आणि अभिनेत्री होत्या. त्यांनी ‘आजा मेरी जान’ (1993) या चित्रपटातून कृष्ण कुमार यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 2000 च्या सुरुवातीला ‘वो बीते दिन’ हे त्यांचं गाणं खूप गाजलं होतं. त्यांचे वडील अजित सिंह हे संगीतकार आणि बहीण नताशा सिंह अभिनेत्री होती. कृष्ण कुमार हेसुद्धा टी-सीरिजचं काम पाहायचे. गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार हा टिशाचा चुलत भाऊ आहे.