मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला अपमानित करून हाकलून दिलं?
Rajpal Yadav: दिवंगत अभिनेते मुश्ताक खान यांच्या शोकसभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये राजपाल यादवचा अपमान करून त्याला तिथून जाण्यास सांगितलं जात असल्याचं दिसतंय. या व्हिडीओमागचं सत्य जाणून घ्या..

दिवंगत अभिनेते मुश्ताक खान यांच्या प्रार्थना सभेत अभिनेता राजपाल यादवसोबत कथित गैरवर्तन झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला राजपाल यादवला, “आपको बाहर भेजा जाएगा… हमने आपको समझाया..” (तुम्हाला बाहेर पाठवलं जाईल, आम्ही तुम्हाला आधीच समजावलंय..) असं म्हणताना ऐकू येत आहे. त्यामुळे राजपाल यादवचा अपमान करून त्याला प्रार्थना सभेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आबे. मात्र, या व्हिडीओमागचं संपूर्ण सत्य काहीसं वेगळं असल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबर रोजी मुंबईत मुश्ताक खान यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजपाल यादव, पूनम ढिल्लों, मुकेश ऋषी, राहुल रॉय, विंदू दारा सिंह, किरण कुमार, राखी सावंत यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. सर्वांनी दिवंगत मुश्ताक खान यांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रार्थना सभेनंतरचा एक व्हिडीओ समोर आला. यात राजपाल यादव माध्यमांशी संवाद साधताना दिसतोय. त्याचवेळी एक महिला मध्येच काहीतरी सांगताना ऐकू येते. “आपको बाहर भेजा जाएगा. हमने आपको समझाया… आप ऐसा क्यों कर रहे हो?” (तुम्हाला बाहेर पाठवलं जाईल, आम्ही तुम्हाला समजावलं.. तुम्ही असं का करत आहात?) असे शब्द व्हिडीओमध्ये ऐकू येतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला आणि राजपाल यादवला शोकसभेतून बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
दुसऱ्या व्हिडीओमधून वेगळं चित्र समोर
मात्र, याच शोकसभेतील आणखी एक व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेचा संदर्भ स्पष्ट झाला. या फुटेजमध्ये एक व्यक्ती राजपाल यादवसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यानंतर शोकसभेतील टीममधील काही सदस्य त्या व्यक्तीला तिथून जाण्यास सांगतात. संबंधित व्यक्ती नंतर माफी मागतो आणि फोन बाजूला ठेवतो. याचवेळी “ये फोटो लेने का प्लेस है क्या?” (ही फोटो काढण्याची जागा आहे का?) असा सवाल ऐकू येतो. त्यामुळे व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडीओचा संबंध राजपाल यादवला तिथून हाकलण्याशी नसल्याचं या दुसऱ्या फुटेजमधून दिसून येतं. राजपाल यादव स्वतः मात्र या प्रसंगानंतर शांतपणे तिथून निघताना दिसला आणि त्याने मुश्ताक खान यांना श्रद्धांजली वाहिली.
पहा व्हिडीओ-
एक अच्छा इंसान थे मुस्ताक भाई : Rajpal Yadav ❤️. @rajpalofficial . .#rajpalyadav #Mustakkhan #Bollywood #Tahirjasus #Reelswithtahirjasus pic.twitter.com/iibQfNKpqw
— jasus007 (@Jasus007tube) September 30, 2026
मुश्ताक खान यांचं 24 सप्टेंबर रोजी निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली.
