शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’चा पार्ट-2 येणार? फराह खान यांनी दिले मोठे संकेत; पोस्ट करत म्हणाल्या…
Main Hoon Na 2: फराह खान यांनी 'मैं हूं ना' या चित्रपटाच्या सिक्वेलचे संकेत दिले आहेत. त्यांनी अर्जुन कपूरच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. फराह खान यांची पोस्ट व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे चित्रपट लोक अनेक वर्षांनंतरही आवडीने पाहतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘मैं हूं ना’. जेव्हा ‘मैं हूं ना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. चित्रपटाची कथा आणि कलाकार या सर्वांना चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातील गाणीही हिट झाली होती. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खान यांनी केले होते. या चित्रपटाद्वारे फराह खान यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. यानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा रंगली आहे. फराह खान यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत संकेत दिले आहेत.
अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने म्हटले आहे की, त्याला हा चित्रपट खूप आवडला आणि त्याने तो नुकताच पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्याने त्याच्या सिक्वेलची मागणी केली. याला फराह खान यांनी प्रतिसाद दिला आहे. अर्जुन कपूरने त्याच्या पोस्टमध्ये स्वतः चित्रपट पाहतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
त्याने लिहिले आहे की, आपला सर्वकालीन आवडता चित्रपट टीव्हीवर पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे. विशेषतः जेव्हा आपण हॉटेलमध्ये असतो आणि या डिजिटल युगात तो आरामात पाहतो. मला लवकरात लवकर सिक्वेल हवा आहे, असं त्याने पोस्टमध्ये लिहिले. यावर फराह खान यांनी पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, हाहाहा… अगर किसी चीज को दि से मांगो… अर्जुन कपूर, लव्ह यू.
आता फराह खान यांच्यामुळे चाहते ‘मैं हूं ना’च्या सिक्वेलसाठी उत्सुक झाले आहेत. चाहते फराह खान यांच्या या पोस्टकडे एक संकेत म्हणून पाहत आहेत. सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. परंतु जर फराह खान यांनी खरोखरच हा चित्रपट बनवला, तर शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणी असेल.
मैं हूं ना या चित्रपटाने ₹२.७२ कोटी कमाईसह सुरुवात केली होती. पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने ₹८.०३ कोटी कमावले. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस, चित्रपटाने ₹३६ कोटी कमाई केली होती. हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. फराह खान दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, झायेद खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, अमृता राव, नसीरुद्दीन शाह, बोमन इराणी आणि राखी सावंत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चाहत्यांना शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांची जोडी खूप आवडली, तसेच झायेद खान आणि अमृता राव यांनाही प्रचंड प्रेम मिळाले होते.
