तिकीट कापल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, विद्यमान आमदाराचा इशारा

आधीच स्वपक्षातून एकमेकांना आता विरोध केला जातोय, तर थेट जातीचा आधार घेत बंडाची भाषाही विद्यमान आमदाराकडून (MLA Narayan Patil) केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच शिवसेनेत अंतर्गत वादाला तोंड फुटलंय.

तिकीट कापल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, विद्यमान आमदाराचा इशारा

सोलापूर : विधानसभेपूर्वी कुणी भाजपची, तर कुणी शिवसेनेची वाट धरली. पण यामुळे निष्ठावंतांची नाराजी मात्र पक्षांना ओढवून घ्यावी लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा (MLA Narayan Patil) मतदारसंघातही असंच चित्र आहे. आधीच स्वपक्षातून एकमेकांना आता विरोध केला जातोय, तर थेट जातीचा आधार घेत बंडाची भाषाही विद्यमान आमदाराकडून (MLA Narayan Patil) केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच शिवसेनेत अंतर्गत वादाला तोंड फुटलंय.

सोलापुरात शिवसनेच्या वतीने नव्यानेच पक्षात आलेल्या नेत्यांचा आणि आजी-माजी नेत्यांचा मनोमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एरवी एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे नेते एकाच मंचावर पाहायला मिळाले. मात्र या मेळाव्यात चर्चा रंगली ती करमाळ्याच्या राजकारणाची.. दिवंगत मंत्री दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांनी नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला, करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटलांचा पत्ता कट करून रश्मी बागलांना तिकीट देण्याची चर्चा सुरु आहे. रश्मी बागलांनी जाहीर सभेत राजकारणात प्रत्येकाच्या अपेक्षा असतात असं सांगत अप्रत्यक्षपणे विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीवर दावा केला.

रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला रामराम करून थेट शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. युतीच्या जागावाटपात करमाळ्याची जागा शिवसनेकडे आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचा असताना रश्मी बागलांनी शिवसेनेची निवड का केली? रश्मी बागल कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत उत्सुकता लागलेली होती. त्यातच खुद्द रश्मी बागलांनी आगामी निवडणूक करमाळ्यातून लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नवा वाद पेटला. रश्मी बागलांना उमेदवारी दिली तर थेट बंडखोरीची भाषा विद्यमान आमदारांनी केली. उमेदवारी डावलली तर धनगर समाज पक्षालाच धडा शिकवेल, असा सूचक इशारा नारायण पाटील यांनी शिवसेनेला दिला.

वाचा – शरद पवारांनी लग्न लावून दिलेली तरुणी राष्ट्रवादी सोडणार

निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाकडे उमेदवारीचा पत्ता नसताना शिवसेनेतल्या नेत्यांचा आमदारकीच्या तिकिटाचा हा वाद इथेच संपला नाही. आमदार नारायण पाटील यांनी आम्हाला दोघांना तिकीट न देता थेट जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी निवडणूक लढवावी असा सल्लाही दिलाय.

दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनीही नारायण पाटलांनी कानपिचक्या दिल्या. तिकीट वाटप करणारे नारायण पाटील नाहीत, तर तिकिटाचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असंही ते म्हणाले.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या हातात शिवबंधन बांधलंय खरं, मात्र तिकीट वाटपावरून शिवसेना नेत्यांतच अंतर्गत कलहाची नांदी सुरू झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात टाकतात आणि स्थानिक नेते ‘मातोश्री’चा आदेश कितपत मानतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *