Curry Leaves For Hair: घनदाट केस हवे असतील तर वापरा कढीपत्ता हेअर मसाज, जाणून घ्या फायदे

| Updated on: Jul 12, 2022 | 6:01 PM

कढीपत्त्याचा आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात. त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. हाच कढीपत्ता केसांच्या वाढीसाठीही अतिशय उपयोगी ठरतो. घनदाट केसांसाठी कढीपत्ता वापरून हे उपाय जरूर करुन पाहा.

Curry Leaves For Hair: घनदाट केस हवे असतील तर वापरा कढीपत्ता हेअर मसाज, जाणून घ्या फायदे
कढीपत्ता
Image Credit source: t v 9
Follow us on

 

कढीपत्त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. रोजच्या आहारात त्याचा समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. आपली आजी- आई स्वयंपाक करता पदार्थांची चव आणि त्याचे पोषणमूल्य वाढवण्यासाठी अनेक वर्षांपासून कढीपत्त्याचा (Curry Leaves) वापर करतात. मात्र हाच कढीपत्ता केसांच्या वाढीसाठीही (Hair Growth) अतिशय उपयुक्त ठरतो. लांब, घनदाट आणि निरोगी केस हवे असतील तर जेवताना कढीपत्ता वापराच, पण त्याचसोबत कढीपत्त्याचे तेल ( Curry leaf oil) तसेच त्याचा हेअर मसाजही लावा. कढीपत्त्यामध्ये ॲंटीऑक्सिडंट गुण असतात. तसेच त्यामध्ये प्रोटीनही बरेच असते. त्याच्या वापरामुळे केसांच्या मुळांचे छान पोषण होऊन ते निरोगी आणि मजबूत होतात. तसेच केसांचा कोरडेपणा, कोंडा, केसगळती अशा अनेक समस्याही दूर होण्यास मदत होते. कढीपत्त्यापासून वेगवेगळे हेअर मसाज कसे बनवायचे, ते जाणून घेऊया.

दही व कढीपत्त्याचा हेअर मसाज

हा हेअर मसाज बनवण्यासाठी मूठभर कढीपत्त्याची पाने घेऊन ती स्वच्छ धुवून वाळवावीत. त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड करून घ्यावी. आता एका बाऊलमध्ये कढीपत्त्याची पूड व दही एकत्र करून ते मिश्रण एकजीव करावे. हा हेअर मसाज केसांसह टाळूलाही लावावा. थोड्या वेळाने केसांना हळुवार हातांनी मसाज करावा. साधारण 30 ते 40 मिनिटे हा मसाज राहू द्यावा. त्यानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. या हेअर मसाजमुळे तुमचे केस चमकदार बनतील व कोरडे होणार नाहीत.

हे सुद्धा वाचा

कढीपत्ता, आवळा आणि मेथीचा हेअर मसाज

हा हेअर मसाज बनवण्यासाठी अर्धा कप मेथीदाणे व कढीपत्त्याची पाने घ्यावीत. त्यांची बारीक पेस्ट करून घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये एक आवळा बारीक किसून घालावा. हे सर्व मिश्रण नीट एकत्र करून घ्यावे. आता हा हेअर मसाज संपूर्ण स्कल्पवर लावावा व हाताने मसाज करावा. साधारण 20 ते 30 मिनिटे हे मिश्रण केसांवर राहू द्यावे. त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. मेथी, कढीपत्ता आणि आवळ्यातील औषधी गुणधर्मांमुळे केसांचे पोषण होते व त्यांची वेगाने वाढही होते.

कढीपत्ता तेल

हे तेल बनवण्यासाठी एक वाटीभर नारळाचे तेल घ्यावे. कढीपत्त्याची मूठभर पाने स्वच्छ धुवून कोरडी करुन घ्यावीत. एका पॅनमध्ये हे तेल व कढीपत्त्याची पाने एकत्र करावीत व ते थोडा वेळ गरम होऊ द्यावे. तेल उकळल्यानंतर गॅस बंद करून तेल थंड होऊ द्यावे. आता हे गार झालेले तेल गाळून घ्यावे व एका बाटलीत भरून ठेवावे. हे तेल रोज केसांना लावून छान मालीश करावे. नारळाच्या तेलातील व कढीपत्त्यातील औषधी गुणधर्म केसांच्या वाढीसाठी पोषक असतात. या तेलाच्या नियमित वापरामुळे केसगळतीची समस्याही दूर होण्यास मदत होते.

कढीपत्ता व कांद्याचा हेअर मसाज

हा हेअर मसाज तयार करण्यासाठी कढीपत्त्याची 15- 20 पाने स्वच्छ धुवून, पुसून घ्यावीत. या पानांची बारीक पूड करून घ्यावी. एक कांदा चिरून त्याचा रस काढून घ्यावा. आता एका वाटीत कढीपत्त्याची पूड आणि कांद्याचा रस एकत्र करून मिश्रण नीट ढवळावे. ही पेस्ट केसांवर नीट लावून साधारण 1 तास ठेवावी. त्यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवून टाकावेत. या हेअर मसाजच्या नियमित वापरामुळे केस गळणे व पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.