उन्हाळ्यात लघवीचा रंग पिवळा का होतो? गरमी की अन्य कारण? हे जाणून घेतलंच पाहिजे
उन्हाळ्यात पिवळी लघवी होणं, हे डिहायड्रेशनमुळे सामान्य आहे, कारण घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. युरोक्रोम नावाच्या पिगमेंटमुळे लघवीचा रंग पिवळा दिसतो. पुरेसे पाणी प्यायल्याने लघवीचा रंग सामान्य होतो. मात्र, जर वारंवार गडद पिवळी लघवी येत असेल किंवा इतर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

जेव्हा कडक उन्हाळा असतो तेव्हा त्याचा थेट शरीरावर परिणाम होतो. उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होते. शिवाय प्रचंड तहान लागत असते. या काळात लघवी सुद्धा पिवळी येत असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं असेल. काही लोकांना केवळ पिवळी लघवी येते तर काहींना पिवळी लघवी येतानाच लघवीची दुर्गंधीही येते. कधी कधी लघवी करताना जळजळही होते. त्यामुळे लोक घाबरून जातात. एखाद्या आजाराचे हे संकेत तर नाही ना? असं त्यांना वाटतं. पण डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात लघवी पिवळी येणं ही सामान्य बाब आहे. कारण या हवामानात शरीरातून अधिक पाणी बाहेर पडतं. पण यासोबत इतर काही लक्षणे आढळले तर ते आजाराचं लक्षण असू शकतो. त्यामुळे थेट डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात शरीर स्वत:ला थंड ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे शरीरातून घाम निघत असतो. घामातून शरीरातील पाणी आणि काही महत्त्वाचे मिनरल्स बाहेर पडतात. या काळात जर पुरेसं पाणी प्यायलं नाही तर पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशनमुळे लघवी कन्सन्ट्रेट होते, त्यामुळे लघवी पिवळी होते. जेव्हा शरीरातील पाणी कमी होते तेव्हा किडनी शरीरातील पाणी वाचवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळेच लघवी ही अधिक गडद आणि पिवळी दिसते.
अधिकाधिक पाणी प्यायल्याने…
यूरोक्रोम नावाच्या नैसर्गिक पिगमेंटच्यामुळेही लघवीचा रंग हलका पिवळा होतो. सामान्यरित्या शरीर जेव्हा संपूर्णपणे हायड्रेटेड होतं तेव्हा लघवीचा रंग हलका पिवळा होतो. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा लघवीचा रंग गडद पिवळा किंवा डार्क दिसतो. मात्र, अधिकाधिक पाणी प्यायल्याने लघवीचा रंग फिकट होऊ लागतो.
म्हणून रंग बदलतो
एक्सपर्टच्या मते, गरमी आणि डिहायड्रेशन या दोन गोष्टी लघवी पिवळी होण्यास कारणीभूत असतात आणि ही सामान्य गोष्ट आहे. त्याचं प्रत्येकवेळीच कारण गरमी हेच असतं असं नाही. अनेकदा काही औषधे घेतल्याने किंवा सप्लीमेंट्स घेतल्यानेही लघवीचा रंग बदलतो. खासकरून व्हिटामिन-B ची सप्लिमेंट घेतल्यावर लघवीचा रंग पिवळा चमकदार होतो. याशिवाय लिव्हरचा आजार, यूरिन इन्फेक्शन आणि किडनी संबंधित आजारानेही लघवीचा रंग गडद होतो. जर बराच काळापासून लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)