India-US : रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारताने अमेरिकेला सुद्धा दिला तितकाच बिझनेस, तक्रारीला संधी मिळणार नाही केलं असं काम
India-US : भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेचा तक्रारीचा सूर असतो. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांना तक्रारीला वाव मिळणार नाही असं काम भारताने केलं आहे. रशियाकडून तेल खरेदी करतो, तर भारताने अमेरिकेला सुद्धा बिझनेस दिला आहे.

भारत आणि अमेरिकेत मागच्या वर्षभरात व्यापारी संबंध मजबूत झाले आहेत. खासकरुन ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशात व्यवसाय वाढला आहे. अमेरिका आता भारताला LPG चा सर्वाधिक पुरवठा करणारा देश बनला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी बेथनी मॉरिसन यांनी ही माहिती दिली. न्यूयॉर्क फॉरेन प्रेस सेंटरमध्ये एका कार्यक्रमात मॉरिसन भारत-अमेरिका संबंधांवर बोलल्या. मागच्या वर्षभरात दोन्ही देशांमध्ये व्यापाराचा विस्तार झाला आहे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका ऊर्जा, संरक्षण, व्यापार आणि कूटनितीसह अनेक क्षेत्रात मिळून एकत्र काम करतायत. भारताने आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी वेगवेगळ्या देशांकडून पुरवठा वाढवला आहे, असं मॉरिसन यांनी सांगितलं. अमेरिका आता भारताचा सर्वात मोठा ऊर्जा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे.
“अमेरिका भारताला सर्वाधिक LPG निर्यात करणारा देश बनल्याचा आम्हाला अभिमान आहे. भारत आपल्या ऊर्जा आयातीमध्ये विविधता आणत आहे. त्यात अमेरिकाही पुरवठादार बनल्याचा आम्हाला आनंद आहे” असं बेथनी मॉरिसन म्हणाल्या. त्यांनी भारत-अमेरिकेत झालेल्या संरक्षण कराराचाही उल्लेख केला. संरक्षणासह अणूऊर्जा क्षेत्रातही दोन्ही देश पुढे जात असल्याचं त्या म्हणाल्या. भारताने जवळपास 20 वर्षांनी आपल्या अणूऊर्जा क्षेत्राशी संबंधित नियम बदलले असून SHANTI Act मंजूर केला आहे. भारत आणि अमेरिकेत अणूऊर्जा सहकार्य क्षेत्रात प्रगती होऊ शकते. अमेरिका-इराण युद्धाच्यावेळी अन्य देशांप्रमाणे भारताचा LPG पुरवठाही बाधित झाला होता. त्यावेळी भारताने पुरवठ्यात विविधता आणण्याचं ठरवलं. फक्त आखाती देशांवर अवलंबून न राहता, अन्य देशांकडून LPG आयात वाढवली.
ट्रम्प प्रशासनासाठी संपूर्ण दक्षिण आशिया महत्वाचा
भारत आणि अमेरिकेत सहकार्य फक्त ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रापुरता मर्यादीत नाही असं बेथनी मॉरिसन म्हणाल्या. दोन्ही देशात मोठे व्यापारी करार सुद्धा होत आहेत. क्वाड सारख्या मंचावर दोन्ही देश मिळून काम करतायत. ट्रम्प प्रशासनासाठी संपूर्ण दक्षिण आशिया महत्वाचा आहे असं मॉरिसन म्हणाल्या. ट्रम्प शासन दक्षिण आशियाला जगातील महत्वपूर्ण क्षेत्र मानतात. आता अमेरिका या क्षेत्रावर जास्त लक्ष देत आहे असं ट्रम्प यांनी सांगितलं.
