कल्याण पूर्वेतील नेतवली चित्राबाई चाळीत गर्दुल्ल्यांचा हैदोस, सहा घराची केली तोडफोड…
कल्याण येथील नेतीवली पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जयभवानी नगरात सहा घरांची गर्दुल्ल्यांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

कल्याण पूर्वेकडील भागात नशेखोरांच्या उच्छादाने सर्वसामान्य लोक दहशतीखाली असल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्वेतील जयभवानी नगरमधील चित्राबाई चाळीत नशेखोरांनी तब्बल पाच ते सहा घरांची तोडफोड करत घरातील सामानाची चोरी केली आहे. घरांचे दरवाजे तोडले, खिडक्यांच्या काचा फोडल्या, तर वीज मीटरच्या मुख्य वायरही जाळल्या आहेत. विशेष म्हणजे, नेतीवली पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नशेखोरांच्या दहशतीमुळे काही रहिवाशांनी तर आपली घरे सोडून दुसरीकडे स्थलांतर केले आहे.
घरांचे तुटलेले दरवाजे, खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, घरातील सामानाची नासधूस आणि वीज मीटरच्या जळालेल्या वायर… हे चित्र आहे कल्याण पूर्वेतील जयभवानी नगरमधील चित्राबाई चाळीचे! परिसरात रात्रीच्या वेळी नशेखोर तरुणांचा अड्डा जमतो आणि याच तरुणांनी आता रहिवाशांच्या घरांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. तब्बल पाच ते सहा घरांमध्ये तोडफोड करण्यात आली असून एका घरातील फ्रिजसह इतर सामान चोरीला गेल्याचेही समोर आले आहे. काही घरांचे दरवाजे तोडून घरातील वस्तूंची नासधूस करण्यात आली आहे. तर वीज मीटरच्या मुख्य वायरही जाळण्यात आल्या आहेत. घरांमध्ये गॅस सिलिंडर असताना हा प्रकार घडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
वैशाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या तरुणांच्या दहशतीमुळे महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहात जाणेही कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी महिला आणि मुली घराबाहेर पडण्यास घाबरत असून विरोध करणाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. याआधीही पोलिसांकडे तीन ते चार वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, नेतीवली पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा सर्व प्रकार सुरू असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या दहशतीला कंटाळून काही रहिवाशांनी आपली घरे सोडून डोंबिवलीसह इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे. आता या प्रकरणी वैशाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई, नुकसानभरपाई आणि परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
