Mahesh Manjrekar : …आणि बोलता, बोलता त्याला अटॅक आला, महेश मांजरेकरांनी सांगितलं शेवटच्या क्षणी नानांसोबत काय घडलं?
Mahesh Manjrekar On Nana Patekar : महेश मांजरेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्यासोबत शेवटच्या क्षणी काय घडलेलं, याबद्दल सांगितलं आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनाही नानांच्या जाण्याचा मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी नानांच्या आठवणी सांगताना एक मोठी खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे, नानांच्या घरापासून अवघ्या चार मिनिटांच्या अंतरावर रुग्णालय असतानाही ते वेळेत तिथे का गेले नाहीत, असा प्रश्न मांजरेकरांनी उपस्थित केला.
नानांचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही
महेश मांजरेकर यांनी ‘न्यूज १८ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, नानांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा ते लंडनमध्ये होते. त्यामुळे त्यांना नानांचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही. ही गोष्ट आजही त्यांना मनातून त्रास देते. नाना आपल्याला सोडून जातील, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. नाना कायम तंदुरुस्त असायचे. त्यांना कधी ताप आला आहे, ते आजारी आहेत किंवा आराम करत आहेत, असं ऐकल्याचंही आठवत नसल्याचं मांजरेकरांनी सांगितलं. त्यामुळे नानांच्या निधनाची बातमी त्यांच्यासाठी अनपेक्षित होती.
मुलाखतीदरम्यान, महेश मांजरेकर यांना आज जर नानांना मिठी मारून काही सांगायचं असेल, बोलायचं असेल, तर काय सांगितलं असतं, असं विचारण्यात आलं. यावर महेश मांजरेकर म्हणाले की, ‘काय सांगू शिवी घातली असती अजून काय. तू असा गेलास हे बरोबर नाही केलं. तुला हक्क नव्हता जायचा. म्हणजे मी नसताना. म्हणजे आजारी पड रे आम्ही आलो असतो. कधीच मरणार नाही असं वाटणारा माणूस. मला कधी कधी वाटत, माणसाला थोडा काहीतरी आजार असलेला बरा, म्हणजे आपण अधिक काळजीपूर्वक राहतो.’
‘अडीच वाजता तुला जर अस्वस्थ वाटत होतं, तर निरोप कसला पाठवतोस. त्याचा भाऊ बाजूला मीरा मारला राहतो. साडेतीनला त्याला सांगितलं, ‘मला अजूनही बरं वाटत नाही. पण तू आहेस ना, मी तुला काय वाटलं तर सांगेन’. तरी तो लगेच तिथं गेला. नानाचं घर आहे तिथून चालत गेलात तर चार मिनिटांवर मणिपाल हॉस्पिटल आहे. तो म्हणाला, ‘नाना आपण डॉक्टरकडे जाऊ’. तर नाना म्हणाला, ‘गॅस असं वाटतंय, वाटलं तर सांगू’, हे बोलता बोलता अटॅक आला.’
जवळच हॉस्पिटल होतं आणि अस्वस्थ वाटत असताना नाना का गेला नाही, या विचारानेच आपल्याला त्रास होतो, आपली चिडचिड होते, असं महेश मांजरेकर यांनी सांगितलं.
