अमृता फडणवीसांनी भाऊबिजेला बोलवलं नाही, पण बहिणीला ऐपतीप्रमाणे भाऊबिज पाठवणार- जरांगे पाटील
आपण पोहरा देवी येथे आज धर्मगुरुंसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही. जात, धर्म कोणताही असो महंताच्या गादीला पहिला सन्मान देण्याची पद्धत आहे असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.

बंजारा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भूमिका मी आधीच मांडली आहे, त्यांनी फक्त उसच तोडायचे का ? बंजारा बांधवाच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? बंजारा आणि मराठा बांधवांनी फक्त उसाच्या मळ्या बांधायच्या का? मी मराठा समाज एकत्र केलाय, बंजारा समाजानेही इतिहास पहावा असे आवाहन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. वाशीम येथे पोहरा देवीचे दर्शन मनोज जरांगे यांनी घेतले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी वाशीम येथे पोहरा देवीचे दर्शन घेतले आहे. बंजारा समाजाच्या काशीत येण्याचं मला भाग्य लाभल्याचे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. ही काशी प्रगतीकडे चालली आहे, आता बंजारा समाजाने व्यसन सोडून एकजूट राहिलं पाहिजे असेही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
आरक्षणाशिवाय भाचे मरताहेत त्याचं काय ?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालनात जाऊन लाडक्या बहिणींच्या दारात जाऊन दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की शिंदे लाडक्या बहिणींच्या दारात दिवाळी साजरी करताहेत चांगली गोष्ट आहे. पण आरक्षणाशिवाय भाचे मरताहेत त्याचं काय ? असाही सवाल मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे.
गोकुळ दूधसंघाच्या निवडणूकीवर राजकारण सुरु आहे, त्याबदद्ल विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की राजकीय विषय आहे. त्यावर बोलणार नाही मात्र लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे असे जरांगे पाटील म्हणाले. पाचशे कोटी रुपयांच्या ऑडिओ टेपवर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपाच्या नेत्यांवर आरोप केले होते. त्याबद्दल विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की रामदास कदम यांच्याकडे काही पुरावे असतील म्हणून ते बोलले असतील. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावे असेही जरांगे पाटील यावर म्हणाले.
ऐपतीप्रमाणे भाऊबीज पाठवणार
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होते, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील आपले भाऊ आहेत.त्यांनी घरी जेवायला यावे अशी मागणी केली होती. त्यावर आपण आता आंदोलन करत आहोत. भावाला मैदानातून असे बोलावू नये. हे आंदोलन संपले की आपण जरुर भाऊबीजेला साडी चोळी घेऊन अमृताताईंना भेटण्यासाठी जाऊ असे जरांगे पाटील म्हणाले होते. त्यासंदर्भात विचारले असता सुनेत्रा ताई, अमृताताईंना माझ्या ऐपतीप्रमाणे भाऊबीज पाठवणार आहोत. मला बोलवलेलं नाही, पण भाऊबीज पाठवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.
