Stock Market Today: सेन्सेक्स 82 हजारांपार, अवघ्या एका मिनिटात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई; शेअर बाजारात तेजी
Stock Market Today: शेअर बाजारात आज तुफान तेजी बघायला मिळत आहे. या दमदार सुरुवातीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुंतवणूकदारांची सकाळ शेअर मार्केटने होते. भारतीय शेअर बाजारात आज,11 नोव्हेंबर रोजी सकाळी व्यवहार सुरू होताच जोरदार तेजी पाहायला मिळाली. दिवाळीच्या सुट्टीनंतर उघडलेल्या देशांतर्गत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,142 अंकांच्या उसळीसह 82,248 च्या पातळीवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 293 अंकांनी वधारून 25,333 वर पोहोचला. बाजाराच्या या दमदार सुरुवातीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या तेजीचा फायदा कसा गुंतवणूकदारांना झाला हे ही जाणून घ्या. याशिवाय आज कोणते शेअर्स चर्चेत राहणार याबद्दलही जाणून घ्या.
एका मिनिटात 5 लाख कोटींची कमाई!
शेअर बाजारातील तेजीचा सर्वाधिक जबरदस्त फायदा गुंतवणूकदारांना झालेला दिसून येत आहे. बाजार उघडल्यानंतर अवघ्या एका मिनिटात गुंतवणूकदारांना जवळपास 5 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 506 लाख कोटी रुपयांवरून वाढून 511 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. यामुळे एवढा मोठा फायदा झाला आहे. याशिवाय विशेष म्हणजे सेन्सेक्समधील सर्व 30 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणावर व्यवहार करत होते. इंडिगो, टायटनसह अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये 0.45 टक्क्यांपासून ते 3.48 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली.
गिफ्ट निफ्टीकडून तेजीचे संकेत?
आज, बुधवारी सकाळी बाजार सुरू होण्यापूर्वीच भारतीय शेअर बाजारात तेजीचे संकेत मिळत होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गिफ्ट निफ्टीमध्ये जवळपास 280 अंकांची वाढ झाली होती. गिफ्ट निफ्टी 25,324 च्या आसपास व्यवहार करत होता. त्यामुळे बाजार उघडताना मोठी तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
आज कोणते शेअर्स राहणार चर्चेत?
आज अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर असणार आहेत. यामधील महत्त्वाचे म्हणजे टाटा पॉवर, क्युपिड, हिंदुस्तान कॉपर आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स हे शेअर्स विशेष चर्चेत राहण्याची शक्यता आहे. या कंपन्या आज आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. त्यामुळे हे शेअर्स चांगलेच चर्चेत आहेत.
कोचीन शिपयार्ड आणि MRF यांनी काय केली घोषणा?
सरकारी कंपनी कोचीन शिपयार्डने दुसऱ्या तिमाहीत नफ्यात वार्षिक आधारावर जवळपास 50 टक्क्यांची घट नोंदवली आहे. मात्र, कंपनीच्या महसुलात 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने भागधारकांसाठी प्रति शेअर 3 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. दुसरीकडे, टायर उत्पादक कंपनी MRF च्या महसुलात 17.4 टक्क्यांची वाढ झाली असली, तरी कंपनीचा नफा 13 टक्क्यांनी घसरून 417 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 3 रुपयांचा अंतरिम लाभांश मंजूर केला आहे.
एकूणच, देशांतर्गत शेअर बाजाराने आज दमदार सुरुवात केली असून गुंतवणूकदारांचे लक्ष आता कंपन्यांच्या तिमाही निकालांवर आणि जागतिक बाजारातील घडामोडींवर असणार आहे.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. वरील माहिती केवळ बातमीच्या उद्देशाने देण्यात आली असून, ती कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. यासाठी TV9 मराठी जबाबदार नाही.)
