UPSC चे स्वप्न भंगले, KBC चे हॉट सीटही हुकले, मग बीटेक झालेल्या तरुणाने मुंबईत घातला दरोडा
Mumbai Crime News: UPSC चे स्वप्न भंगले, KBC मध्येही हॉट सीटपर्यंत पोहोचता आले नाही, मग कर्जबाजारी झालेल्या तरुणाने थेट गुन्हेगारीचा मार्ग निवडला. त्याने कांदिवलीत ज्वेलर्समधून ५ लाखांची सोन्याची साखळी लांबवली. हा तरूण बीटेक कॉम्युटर सायन्स पदवीधर आहे. कांदिवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Mumbai Crime News: अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच आणि अपयश… कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, आणि अखेर कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत दरोडा टाकला. मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील एका ज्वेलर्समधून ५ लाख रुपयांची सोन्याची साखळी लांबवणाऱ्या या सुशिक्षित आरोपीला कांदिवली पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. सतीश कुमार कृष्णप्रसाद केसरी, वय ४२, राहणार उत्तम नगर, दिल्ली, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी असून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पदवीधर आहे.
आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने नोकरी सांभाळत यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती, मात्र त्यात त्याला यश आले नाही. त्यानंतर नशीब आजमावण्यासाठी त्याने लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ मध्येही सहभाग घेतला होता. मात्र तो केवळ ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ फेरीपर्यंतच पोहोचू शकला, त्यामुळे त्याचे ‘हॉट सीट’वर बसण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
त्यानंतर ट्रॅव्हल व्यवसायात त्याला मोठे नुकसान झाले आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला. अखेर शॉर्टकट म्हणून त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्षभरानंतर कांदिवली पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली आहे.
मुंबई पोलिसांची कमाल, अहोरात्र मेहनतीनंतर आरोपीला अटक
कर्ज परतफेड अशक्य झाल्याने मग सतीश केसरीने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात तो ग्राहक म्हणून जायचा. दागिने पाहायचा आणि संधी साधून दागिने लांबवायचा. सुरुवातीला त्याला असे करण्यात यश आल्यावर त्याने हाच मार्ग स्वीकारला. गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी तो कांदिवली पश्चिममधील मथुरादास रस्त्यावरील पद्मावती ज्वेलर्स या दुकानात आला. तिथे त्याने ४३.२ ग्रॅम वजनाची आणि ५ लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी लांबवली.
ज्वेलरने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रे तयार केली, डुप्लिकेट ओळखपत्र सादर केले होते. चोरी झाल्यानंतर त्याने मोबाइलही बंद केला होता. त्यानंतर तो थेट दिल्लीत पोहचला. कांदिवली पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही आधारे, तांत्रिक पुराव्या आधारे त्याचा माग काढला. तांत्रिक पुराव्याच्या जोरावर मुंबई पोलिसांनी दिल्लीत छापा टाकला आणि सतीशला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याची साखळी जप्त केली.
