Winter Health Care: गूळ, तूप ते बाजरी; हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आतापासूनच खायला सुरुवात करा ‘हे’ पदार्थ

Immunity Booster Foods For Winter: उन्हाळ्यातून हिवाळ्याकडे हवामान बदलत असताना तापमानातील बदलाचा परिणाम आरोग्यावरही होतो. त्यामुळे शरीराला या बदलासाठी तयार करणे आवश्यक आहे. शरीर उबदार राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, हे जाणून घ्या.

Winter Health Care: गूळ, तूप ते बाजरी; हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आतापासूनच खायला सुरुवात करा ‘हे’ पदार्थ
गूळ, तूप ते बाजरी; हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आतापासूनच खायला सुरुवात करा ‘हे’ पदार्थ
| Edited By: | Updated on: Nov 17, 2026 | 1:54 PM

नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढू लागला असून सकाळी आणि संध्याकाळी चांगलीच थंडी जाणवत आहे. त्याचबरोबर प्रदूषणाची समस्याही कायम आहे. अशा वातावरणात आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात ऋतूनुसार बदल करणे गरजेचे आहे. न्यूट्रिशनिस्ट गीतिका चोप्रा यांनी हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, केवळ एखादा सुपरफूड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही, तर संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीमुळे ती मजबूत राहण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया, हिवाळ्यात कोणते पदार्थ खावेत.

भरड आणि उष्ण धान्ये

Loading...

आहारात नेहमी पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. हिवाळ्यात बाजरी, नाचणी, ज्वारी आणि मका यांसारख्या पारंपरिक धान्यांचा आहारात समावेश करा. यामध्ये फायबर, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि खनिजे असतात. हे घटक शरीराला ऊर्जा देण्यास आणि पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. बाजरीची भाकरी, नाचणीची पेज आणि ज्वारीची खिचडी हे आहारातील चांगले पर्याय आहेत.

शरीराला उबदार ठेवतील हर्बल टी

हिवाळा सुरू झाला असल्याने आहारात आले, तुळस, दालचिनी आणि ज्येष्ठमध यांचा वापर करून तयार केलेल्या हर्बल टीचा समावेश करू शकता. ही गरम पेये शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास आणि घशाला आरामदायी वाटण्यास मदत करतात. मात्र, हर्बल टीला रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा पर्याय किंवा औषध समजू नये.

हंगामी हिरव्या भाज्या

पालक, मेथी, मोहरीची पाने, चाकवत आणि ब्रोकोली यांसारख्या हंगामी हिरव्या भाज्या आवर्जून खाव्यात. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक रोगप्रतिकारक शक्तीचे सामान्य कार्य सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात.

मर्यादित प्रमाणात देशी तूप

हिवाळ्यात आहारात मर्यादित प्रमाणात देशी तुपाचा समावेश करू शकता. तुपातून शरीराला ऊर्जा आणि चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे मिळतात. मात्र, तुपाचे अतिसेवन केल्यास शरीरातील सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे तूप खाताना त्याचे प्रमाण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

गुळाचा आहारात करा समावेश

गुळामध्ये लोह आणि काही खनिजे अल्प प्रमाणात असतात. त्यामुळे हिवाळ्यात मर्यादित प्रमाणात गूळ खाऊ शकता. मात्र, गुळामध्येही साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे त्याचे अतिसेवन टाळावे. गूळ हा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा कोणताही जादुई पदार्थ नाही. मात्र, त्याची प्रकृती उष्ण असल्याचे मानले जाते.

जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड (ALA), फायबर आणि लिग्नॅन्स भरपूर प्रमाणात असतात. एक चमचा जवसाची पूड दही, ओट्स, दलिया किंवा सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. यामुळे हृदयाचे आरोग्य आणि शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.

विशेष सूचना : हिवाळ्यात केवळ गरम पदार्थ खाणे पुरेसे नाही. आहारात हंगामी फळे, पुरेशा प्रमाणात प्रथिने, सुकामेवा, बिया आणि भाज्यांचा समतोल राखणेही महत्त्वाचे आहे. यासोबतच दररोज ७ ते ९ तासांची झोप घेणे, नियमित शारीरिक हालचाली करणे आणि पुरेसे पाणी व इतर द्रवपदार्थ पिण्याकडेही लक्ष द्यावे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us