Heart Health: हृदयाची काळजी घ्यायची असेल तर औषधांआधी ताटाकडे लक्ष द्या; ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर
World Heart Day 2026: रोजच्या खाण्याच्या सवयी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात किंवा धोका वाढवू शकतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घेऊया.

Heart Health Tips: हृदयाची धडधड सुरळीत ठेवायची असेल, तर सुरुवात ताटापासूनच करावी लागेल! केवळ व्यायाम करून किंवा औषधांवर अवलंबून राहून हृदयाची काळजी घेता येत नाही. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयींचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. जेवणाच्या अनियमित वेळा, जंक फूड, तेलकट पदार्थ आणि वाढता ताण याचा परिणाम शरीराच्या एकूण आरोग्यावर होतो. यामध्ये हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. अशा परिस्थितीत हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. रोजच्या जेवणात केलेल्या छोट्या-छोट्या बदलांमुळे आहार अधिक संतुलित ठेवता येतो. यासाठी महागडे किंवा कठीण डाएट फॉलो करण्याची आवश्यकता नसून, योग्य पदार्थांची निवड आणि काही गोष्टींचे सेवन मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि कोणते पदार्थ टाळणे योग्य, जाणून घ्या.
आहारात काय असावे?
हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. आहारातील योग्य पोषक घटक शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यासोबतच हृदयाच्या आरोग्याचीही काळजी घेण्यास मदत करतात. मग हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, हे जाणून घेऊया.
हिरव्या पालेभाज्या आणि फळे ठरतात महत्त्वाची
पालक, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांसोबत टोमॅटो, गाजर, बीन्स आणि ब्रोकोली यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करता येतो. त्याचप्रमाणे पेरू, संत्री, सफरचंद आणि हंगामी फळेही चांगला पर्याय आहेत. या पदार्थांमधून फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि वनस्पतीजन्य पोषक घटक मिळतात. फळांचा रस पिण्यापेक्षा शक्यतो संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. कारण संपूर्ण फळातून फायबर मिळते आणि पोट अधिक काळ भरल्याची भावना राहू शकते.
संपूर्ण धान्याचा आहारात करा समावेश
निरोगी हृदयासाठी आहारात रिफाइंड धान्यांऐवजी संपूर्ण धान्यांचा समावेश करण्यावर भर दिला जातो. ओट्स, जव, गव्हाच्या पीठाची पोळी, ब्राउन राइस यांसोबत नाचणी, ज्वारी आणि बाजरी यांसारख्या भरड धान्यांचा वापर करता येतो. या पदार्थांमध्ये रिफाइंड धान्यांच्या तुलनेत अधिक फायबर असते. त्यामुळे रोजच्या जेवणात पांढऱ्या किंवा रिफाइंड धान्यांऐवजी संपूर्ण धान्यांचा समावेश करणे हा आहारातील एक महत्त्वाचा बदल ठरू शकतो.
डाळी आणि कडधान्ये विसरू नका
डाळी, हरभरा, राजमा आणि चवळी यांसारख्या कडधान्यांमध्ये वनस्पतीजन्य प्रथिने आणि फायबर असते. विशेष म्हणजे हे पदार्थ भारतीय पारंपरिक आहारात सहज समाविष्ट करता येतात. डाळ-भात, डाळ-भाजी, कडधान्यांची उसळ अशा विविध स्वरूपात त्यांचा आहारात समावेश करता येतो.
हेल्दी फॅट असलेले डाएट
हेल्दी फॅट्सही संतुलित आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. बदाम आणि अक्रोड यांसारख्या नट्समध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स सह विविध पोषक घटक आढळतात. तसेच जवस आणि चिया सीड्स यांचाही आहारात समावेश करता येतो. मात्र कोणताही पदार्थ आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून तो मोठ्या प्रमाणात खाण्याऐवजी आहारात योग्य प्रमाण आणि एकूण संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.
मांसाहार करणाऱ्यांसाठी मासेही पर्याय
मासे खाणाऱ्यांसाठी सार्डिन, सॅल्मन आणि मॅकरेल यांसारखे मासे ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे स्रोत ठरू शकतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा समावेश करता येतो.
विदेशी डाएटची गरज नाही; पारंपरिक भारतीय आहारही उपयोगी
हृदयाची काळजी घेण्यासाठी महागडे किंवा परदेशी पदार्थच खावे लागतात, असे नाही. भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, डाळी-कडधान्ये, नट्स आणि योग्य तेल यावर आधारित पारंपरिक भारतीय आहार हा संतुलित आहाराचा भाग होऊ शकतो. फक्त एखादा हेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा संपूर्ण आहाराची गुणवत्ता, खाण्याचे प्रमाण आणि योग्य आहाराचे सातत्य यांना अधिक महत्त्व आहे.
कोणते पदार्थ टाळावे?
हृदयाच्या आरोग्याचा विचार करताना काय खावे याबरोबरच काय कमी खावे किंवा टाळावे हे देखील महत्त्वाचे आहे. अतिप्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ, डीप फ्राय केलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस, जास्त साखर असलेली पेये, अनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, ट्रान्स फॅट असलेले पदार्थ, अतिप्रमाणात मीठ यांचे सेवन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः जास्त सोडियमचे सेवन उच्च रक्तदाबाशी संबंधित ठरू शकते.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी फक्त एका पदार्थावर अवलंबून राहण्याऐवजी संपूर्ण आहारपद्धतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. रोजच्या ताटात भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, डाळी-कडधान्ये आणि हेल्दी फॅट्सचा योग्य समावेश करताना प्रक्रिया केलेले, अतितळलेले आणि जास्त मीठ-साखर असलेले पदार्थ कमी करणे हा संतुलित आहाराचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.
(डिस्क्लेमरः या लेखातील महिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा कुठलाही दावा करत नाही. दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)
