
America And Venezuela War : आता नव्या वर्षात एका नव्या युद्धाने जगाला धडकी भरली आहे. विशेष म्हणजे यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच हे युद्ध चालू केले आहे. ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएला देशावर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. व्हेनेझुएलामध्ये मोठे स्फोट घडून आल्यामुळे तिथे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सगळीकडे खळबळ उडाली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमधील मोठ्या लष्करी तळालाच लक्ष्य केले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी समोर येत मोठा आणि खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. व्हेनेझुएला या देशाचे सर्वोच्च नेते राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर आता जगभरात खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर याबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार सध्या व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मादुरो आणि त्यांची पत्नी सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. या दोघांनाही आता व्हेनेझुएला या देशाच्या बाहेर नेण्यात आले आहे. हे स्थळ कोणते आहे? याबाबत मात्र ट्रम्प यांनी अद्याप स्पष्टपणे सांगितलेले नाही. तसेच अमेरिकन सैनिकांनी व्हेनेझुएला तसेच त्या देशाच्या राष्ट्रपतीविरोधात यशस्वीपणे हल्ले केले आहेत, असेही ट्रम्प यांनी थेट सांगितले आहे. अमेरिकन सैनिकांनी केलेले हे हल्ले यूएसच्या लॉ इन्फोर्समेंट विभागाच्या मदतीने करण्यात आल्याचीही माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या ऑपरेशनबद्दल मी लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन, सविस्तर माहिती देणार असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन देशांत वाद चालू होता. अमेरिका व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकत होता. त्यासाठी व्हेनेझुएलावर वेगवेगळी बंधनं लादण्यात आली होती. तसेच कॅरेबियन आणि पॅसिफिक समुद्रात अमेरिकेने आपल्या लढाऊ जहाजांचीही संख्या वाढवली होती. व्हेनेझुएला या सागरी मार्गांच्या माध्यमातून अमेरिकेत ड्रग्जची तस्करी करतो, असा दावा ट्रम्प यांच्याकडून केला जात होता. तर दुसरीकडे मादुरो यांनी मात्र ट्रम्प यांना व्हेनेझुएलामधील माझी सत्ता उलथवून लावायची आहे, असा आरोप केला होता. तसेच ट्रम्प यांना व्हेनेझुएलामध्ये असलेले तेल भांडार बळकवायचे आहे, असाही आरोप केला होता. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील वाद कोणत्या टोकाला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.