कोरोना पुन्हा आला… एकाच महिन्यात सापडले 79 हजार रूग्ण, भारताच्या शेजारील देशात खळबळ
China Coronavirus Cases : भारताचा शेजारी देश चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याचा भारतावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भारताचा शेजारी देश चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहेत. बहुमतांशी रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असून गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. असं असलं तरी जून महिन्यात चीनमध्ये सुमारे 79 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले. यातील 130 रुग्णांची प्रकृती गंभीर होती, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या चीनचा आरोग्य विभाग परिस्थितीतीवर बारीक लक्ष ठेऊन आहे.
चीनमधील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ
चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार, सध्या देशात ओमिक्रॉनचा NB.1.8.1 हा व्हेरियंट वेगाने पसरत आहे. 13 ते 19 जुलैदरम्यानच्या आकडेवारीनुसार, कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर 16.3 टक्क्यांवर पोहोचला असून, त्याआधीच्या आठवड्यात तो सुमारे 12 टक्के होता. तसेच इन्फ्लूएंझाचा पॉझिटिव्हिटी दर 12.6 टक्क्यांवर घसरला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश रुग्णांमध्ये ताप, घशात खवखव, सर्दी आणि पडसे अशी सौम्य लक्षणे दिसत आहेत, यातील बहुतेक जण 5 ते 7 दिवसांत पूर्णपणे बरे होत आहेत.
संसर्ग का वाढत आहे?
आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात लोक जास्त वेळ एअर कंडिशनर असलेल्या बंद जागांमध्ये राहतात. त्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. महत्त्वाची बाब म्हणजे नवीन व्हेरियंट पूर्वीच्या तुलनेत अधिक गंभीर नाहीत. संसर्ग वाढला असला तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या किंवा मृत्यूचे प्रमाण त्याच वेगाने वाढलेले नाही ही एक दिलासादायक बाब आहे.
भारताला किती धोका?
चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असले तरी भारताला घाबरण्याची गरज नाही. चीनमध्ये वेगाने पसरत असलेला NB.1.8.1 व्हेरियंट पूर्वीसारखा धोकादायक नाही, भारतात या व्हेरियंटमुळे कोणतीही असामान्य परिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र तरीही आरोग्य तज्ज्ञांनी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले, कमी प्रतिकारशक्ती असलेले नागरिक आणि गंभीर आजार असलेल्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.