
अलीकडच्या काळात जगभरात सुरू असलेल्या युद्धांचा सर्वाधिक फायदा घेणारा देश म्हणून चीन उदयास आला आहे. यामुळे युद्ध आणि अंतर्गत संघर्षांशी झगडत असलेल्या भागात शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि निर्यात वेगाने वाढली आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तान, रशिया, येमेनचे हौथी आणि आफ्रिकेतील संघर्षात इतर सरकारी व बिगर सरकारी गटांकडून चिनी शस्त्रांचा वापर केला जात आहे. यामध्ये सुदान, दक्षिण सुदान, इथिओपिया आणि इतरत्र वांशिक आणि नागरी संघर्षांचा समावेश आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने मार्चमध्ये जाहीर केलेल्या ताज्या जागतिक शस्त्रास्त्र व्यापार अहवालानुसार, चीनने अलीकडेच विमानांपासून क्षेपणास्त्रे आणि ड्रोनपर्यंतची लष्करी उपकरणे 44 देशांना पाठविली आहेत.
लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांपासून ते हवाई संरक्षण यंत्रणा आणि ड्रोनपर्यंत चीनची 63 टक्के लष्करी निर्यात पाकिस्तानला झाली आहे. ज्यातून दोन्ही देशांमधील घनिष्ठ भागीदारी दिसून येते. मे महिन्यात भारतासोबत झालेल्या संघर्षात या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता.
मात्र, भारत-पाकिस्तान संघर्ष हा एकमेव संघर्ष नव्हता, ज्यात चिनी शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. युक्रेनपासून ते मध्यपूर्वेतील युद्धांपर्यंत चिनी शस्त्रास्त्रे संघर्षांना खतपाणी घालतात. रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या युद्धात चीनने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे.
चीनने रशियाची युद्ध अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यास मदत तर केलीच, शिवाय यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि रसायने अशा दुहेरी वापराचा पुरवठाही केला आहे. ज्याच्या मदतीने तो युद्धासाठी शस्त्रास्त्रे आणि लष्करी यंत्रणा बनवू शकतो. यासोबतच त्यांनी रशियाला लष्करी ड्रोनसारखी शस्त्रेही दिली आहेत. तक्षशिला इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार, रशियाचे चीनवरील अवलंबित्व इतके आहे की तो चीनमधून सुमारे 90 टक्के उच्च प्राधान्याच्या वस्तू आयात करतो आणि जवळजवळ सर्व महत्वाची मशीन टूल्स चीनमधून आयात करतो.
पश्चिम आशियात 7 ऑक्टोबरला झालेल्या आक्रमणापासून सुरू झालेल्या संघर्षात हमासने इस्रायलविरोधात चिनी शस्त्रांचा वापर केला. येमेनी हौथींनी चिनी शस्त्रे खरेदी केली आहेत. पश्चिम आशियातील इराणी सैन्याबरोबरच नागोर्नो-काराबाख प्रदेशाभोवती आर्मेनिया-अझरबैजान संघर्षातही चिनी शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. 70 टक्के आफ्रिकन देश आता चिनी लष्करी वाहने वापरतात.
आफ्रिकेतील संघर्षात चीनची शस्त्रे आणि लष्करी यंत्रणा वापरली गेली आहे. पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांत वापरल्या जाणाऱ्या चारपैकी एक लष्करी यंत्रणा आता चिनी आहे. असा अंदाज आहे की सुमारे 70 टक्के आफ्रिकन देश आता चिनी लष्करी वाहने वापरतात.