आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही

आधी अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला उचलून आणले. त्यानंतर इस्रायलसोबत इराणवर हल्ला चढवला. आता आणखी एक देश अमेरिकेच्या निशाण्यावर आहे. या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने आम्ही अमेरिकेला योग्य उत्तर देऊ असे म्हटले आहे.

आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही
Miguel Díaz Canel and Donald Trump
| Updated on: Apr 13, 2026 | 7:01 PM

एकीकडे इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून हल्ला केला असताना आता अमेरिकेची वक्र दृष्टी आणखी एका देशाकडे वळली आहे. अमेरिकेने क्युबाला आपल्या निशाण्यावर घेतले आहे. या संदर्भात क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांनी म्हटले आहे की अमेरिकेजवळ द्वीपीय राष्ट्रावर सैन्य हल्ला करणे किंवा त्यांना सत्तेवरुन हटवण्याचे कोणतेही वैध कारण नाही.एनबीसी न्यूजच्या ‘मीट द प्रेस’या कार्यक्रमात बोलताना क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांनी क्युबावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण महागात पडेल आणि क्षेत्रिय सुरक्षेला प्रभावित करेल. ते पुढे म्हणाले की जर असे झाले तर क्युबाचे लोक स्वत:चा बचाव करतील. आणि तशी वेळ आली तर मला वाटत नाही अमेरिकेकडे क्युबाच्या विरोधात सैन्य आक्रमण सुरु करणे, ‘सर्जिकल ऑपरेशन’ अथवा राष्ट्राध्यक्षाच्या अपहरणाचे काही औचित्य राहिल. ते म्हणाले जर असे झाले तर युद्ध होईल, संघर्ष होईल आणि आम्ही आमचा बचाव करु !

गरज लागली तर आम्ही मरु देखील, कारण आमच्या राष्ट्रगीतात म्हटले आहे की,’ देशासाठी मरणेचे हे जगणे आहे.’ हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे ज्यावेळी दोन्ही देशांच्या चर्चा सुरु असतानाही तणाव निर्माण झाला आहे. मात्र, या चर्चेतील तपशिल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांनी अमेरिकेवर क्युबाच्या विरोधात “शत्रुतापूर्ण नीती” राबवण्याचा आरोप केला आहे. त्यांना क्युबाकडे कोणतीही मागणी करण्याचा नैतिक अधिकार नाही. क्युबा कोणत्याही अटी शिवाय संवादासाठी आणि कोणत्याही विषयावर चर्चा करायला तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.क्युबा आपल्या राजकीय तंत्रात बदलाची मागणी स्वीकार करणार नाही,जसे आम्ही अमेरिकेच्या व्यवस्थेत बदल करण्याची मागणी करत नाहीत.क्युबाने आपल्या वाढत्या आर्थिक संकटासाठी अमेरिकेच्या ऊर्जा नाकेबंदी जबाबदार ठरवले आहे. ज्यामुळे आरोग्य सेवा, सार्वजनिक परिवहन आणि वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

गरजेच्या केवळ ४० टक्के इंधनाचे उत्पादन

हा देश त्यांच्या गरजेच्या केवळ ४० टक्के इंधनाचे उत्पादन करतो. आणि जानेवारीत व्हेनेझुएलाकडून तेल पुरवठा बंद झाल्याने स्थिती आणखी बिघडली आहे. मार्चमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाने भरलेला एक टँकर क्युबाला पोहचला. ज्याची तीन महिन्यांच्या आधी मागणी केली होती. रशियाने आणखी एक टँकर पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबा सरकारवर टीका करताना म्हटले आहे की येथील नेतृत्व भ्रष्ट आहे आणि तेल पुरवठ्याने कोणताही फरक पडणार नाही. डियाझ कॅनेल यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यांना इशारा रुपात स्वीकारले असून आपल्या लोकांना देशाच्या रक्षणासाठी तयार रहाण्यास सांगितले आहे.

Follow Us