France Protest : आंदोलनामुळे फ्रान्स होरपळला, भारताने संकट ओळखताच घेतला तातडीने महत्त्वाचा निर्णय; सूचना जारी केल्या!
फ्रान्समधील भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या तसेच फ्रान्समध्ये जाण्याच्या विचारात असणाऱ्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना जारी केली आहे.

France Protest Update : सध्या आंदोलामुळे फ्रान्स देश होरपळून निघाला आहे. या देशात तरुण तसेच इतर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. महागाई तसेच सरकारच्या इतर धोरणाविरोधात हे आंदोलन छेडण्यात आले असून सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झालेय. दरम्यान, आता फ्रान्समधील ही स्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फ्रान्समध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारताने तातडीचा हेल्पलाईन नंबर जारी केलाय. तसेच भारतीय नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
भारतीय दूतावासाने जारी केली सूचना
फ्रान्समधील भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या तसेच फ्रान्समध्ये जाण्याच्या विचारात असणाऱ्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना जारी केली आहे. फ्रान्समध्ये अलीकडच्या काळात झालेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार आणि लुटमारीच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणांपासून आणि गर्दीच्या परिसरांपासून दूर राहावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि परिस्थितीबाबत सतत माहिती घेत राहावी, असेही सांगण्यात आले आहे.
आंदोलनाची माहिती हवी असेल तर…
नागरिकांना फ्रान्स सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून परिस्थितीची माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील संभाव्य बदल किंवा अडथळ्यांबाबत संबंधित यंत्रणेच्या वेबसाइटवर तपासणी करावी असेही भारतीय दूतावासाने आपल्या सूचनेत म्हटले आहे. आंदोलनाची अपडेट हवी असेल तर https://gouvernement.fr या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच ट्रॅफिक आणि रहदारीची माहिती हवी असल्यास https://ratp.fr या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे भारतीय दूतावासाने सांगितले आहे.
संपर्क साधण्यासाठी दिले फोन नंबर आणि ई-मेल
भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आपत्कालीन नंबरही जारी केलाय. पॅरिसमधील दूतावासासोबत संपर्क करायचा असेल तर +33 6 48 34 00 63 हा दूरध्वनी क्रमांक तसेच cons.paris@mea.gov.in हा इमेल आयडीही दूतावासाने शेअर केलाय. मार्सिले येथील कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडियाशी संपर्क साधायचा असेल तर +33 7 43 16 25 59 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच cgo.marseille@mea.gov.in या मेल आयडीचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.
