इराणमध्ये लोक रस्त्यावर… थेट राजीमान्याची मागणी, अमेरिकेसोबतच्या करारावर जनता नाराज
Iran Protest : इराण आणि अमेरिकेतील संभाव्य करारावरून इराणमध्ये जनता आक्रमक झाली आहे. लोकांनी रस्त्यावर उतरत परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता संपण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही देशांमध्ये लवकरच शांतता करार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता या करारावरून इराणमध्ये राजकीय वाद अधिकच तीव्र होताना पहायला मिळत आहे. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या एका मुलाखतीनंतर देशातील कट्टरपंथी गटांनी उघडपणे विरोध सुरू केला आहे. मशहद शहरात आंदोलकांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत ‘अराघची राजीनामा द्या’ आणि ‘इराणचा अपमान करणारे अराघची मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. आंदोलकांचा आरोप आहे की अमेरिकेसोतचा करार इराणच्या सामरिक हितांच्या विरोधात आहे आणि सरकारने अमेरिकेसमोर गरजेपेक्षा जास्त मवाळ भूमिका घेतली आहे.
मशहदमध्ये आंदोलक रस्त्यावर
फार्स वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ जारी केला आहे, यात काळे वस्त्र परिधान केलेल्या महिला लाल आणि काळे झेंडे फडकावत परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करताना दिसत आहेत. या आंदोलनादरम्यान जमावाने परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इराणमधील कट्टरपंथी राजकीय गटांचे म्हणणे आहे की, अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित करारातील सध्याच्या अटी देशाच्या हितांना कमकुवत करणाऱ्या आहेत. या करारामुळे होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणची प्रभावी पकड कमी होऊ शकते, जी देशाच्या सर्वात महत्त्वाच्या रणनीतिक ताकदींपैकी एक मानली जाते.
Hardline Iranians have been protesting throughout the day against Foreign Minister Abbas Araghchi and Parliament Speaker Ghalibaf over the emerging U.S.-Iran deal. Demonstrators chanted “Death to Araghchi, the dishonorable compromiser,” “Araghchi, have shame, stop giving in,” and… pic.twitter.com/PRQrYfTxno
— Open Source Intel (@Osint613) June 13, 2026
मुलाखतीनंतर वाद चिघळला
एका टीव्ही मुलाखतीत परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले होते की, प्रस्तावित करारामध्ये अमेरिकेने लादलेली नौदल नाकेबंदी हटवण्याची तरतूद समाविष्ट आहे. ही नाकेबंदी इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतील कारवाईनंतर अमेरिकेने लागू केली होती. अराघची यांनी असेही म्हटले की, होर्मुझ सामुद्रधुनीचे व्यवस्थापन पूर्वीसारखे राहणार नाही. त्यामुळेच अराघची यांना विरोध केला जात आहे.
तेहरानमध्येही आंदोलन
सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत, यात राजधानी तेहरानमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयाबाहेरही नागरिक जमल्याचा दावा करण्यात आला आहे. तेथेही आंदोलकांनी अराघची राजीनामा द्या अशा घोषणा दिल्याचे समोर आले आहे. तसेच इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे.