Ayatollah Khameini: कंठ दाटला, डोळ्यातून अश्रु धारा, खोमेनीच्या मृत्यूची बातमी देताना अँकर धाय मोकळून रडला

TV Anchor Breaks Down: इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेने भीषण हल्ला चढवला. तेहरानसह या देशातील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात खोमेनी आणि त्यांचे कुटुंबिय हे अमेरिकेच्या हिटलिस्टवर होते. अखेर ती वार्ता धडकताच इराणमधील अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला.

Ayatollah Khameini: कंठ दाटला, डोळ्यातून अश्रु धारा, खोमेनीच्या मृत्यूची बातमी देताना अँकर धाय मोकळून रडला
टीव्ही अँकर धायमोकलून रडला
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 01, 2026 | 11:20 AM

Ayatollah Khameini Killed in US-Israel Attack: सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी देशात पसरताच त्यांच्या पाठीराख्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. अरब राष्ट्रातही हे वृत्त पोहचताच अनेकांना झटका बसला. खोमेनी यांच्या मृत्यूची वार्ता प्रसारित करताना सरकारी वृत्तवाहिनीच्या निवेदकाला त्याचा शोक आवरता आला नाही. यावेळी स्टुडिओतील वातावरण धीर गंभीर झाले. खोमेनी ठार झाल्याचे वृत्त वाचत असताना निवेदकाला, अँकरला भावनांना आवर घालता आले नाही. त्याचा कंठ दाटला. डोळ्यात अश्रु तरळले. हुंदके देत देतच त्याने हे वृत्त वाचले आणि तो धाय मोकलून रडला. आपल्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूची वार्ता सांगताना अँकरच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगून जात होते.

निवेदकाला अश्रु अनावर

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर निवेदकाचा आवाज गंभीर झाला. त्याचा आवाजच फुटत नव्हता. कंठ दाटून आला. त्याने अशाही परिस्थितीत त्याचे निवेदन सुरूच ठेवले. ‘वृत्तानुसार, इस्लामिक क्रांतीचे सर्वोच्च नेता, आयतुल्लाह सैयद अली खोमेनी आपल्यात नाहीत, त्यांचे निधन झाले आहे.’ असे वाक्य वाचताना त्याला भावना आवरता आल्या नाही. ही बातमी देशवासियांना सांगताना निवदेकाला रडू कोसळले. तर हे वृत्त पाहताच अनेकांना जबरी धक्का बसला. समर्थकांसह इस्लामिक क्रांतीच्या पाठीराख्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लाखो समर्थक इराणची राजधानी आणि इतर शहरात रस्त्यावर आले. त्यांनी अमेरिकेच्या हल्ल्याचे निषेध केला.

इराणच्या कॅबिनेटने या आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. काळजीवाहू समितीने देशात 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. इराणच्या अनेक भागात शोक व्यक्त करताना लोक दिसले. या हल्ल्यात खोमेनी, त्यांची मुलगी, जावाई, नातवंडांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. हजारो लोक रस्त्यावर उतरली. अर्थात एकीकडे खोमेनी समर्थक समोर येत असले तरी अनेक विरोधक इराणमध्ये आनंद साजरा करतानाही दिसत आहे. खोमेनी यांच्या दडपशाहीतून आपल्याला मुक्ती मिळाली असे संदेश सोशल मीडियावर ही लोक शेअर करताना दिसत आहेत. इराणमध्ये सध्या मोठा विरोधाभास दिसून येत आहे.

दरम्यान खोमेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांची खास रिव्होल्युशनरी आर्मी मोठा बदला घेण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च नेता मारला गेला असला तरी युद्ध थांबलेले नाही. अमेरिकेच्या लष्करी तळावर आणि इस्त्रायलवर हल्ले वाढवण्यात आले आहे. पण इराणकडील दारूगोळा अजून किती दिवस टिकणार असा सुरक्षा तज्ज्ञांचा प्रश्न आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या अत्याधुनिक शस्त्रापुढे या देशाचा अजून किती दिवस निभाव लागणारी ही चर्चा होत आहे.

Follow Us