Blast in Pakistan : पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला, नमाज पठण सुरु असताना मशिदीत शक्तीशाली स्फोट
Blast in Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाहा प्रांतात एक मोठा स्फोट झाला आहे. पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याची ही पहिली घटना नाहीय. यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले आहेत.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाहा प्रांतात एक मोठा स्फोट झाला आहे. खैबर पख्तूनख्वाहच्या पेशावरमध्ये हा स्फोट झाला आहे. नमाज अदा करताना एका मशिदीमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. कोहाट येथे ओल्ड पोलीस लाइनजवळ एक मशीद आहे, तिथे हा ब्लास्ट झाला. स्फोटानंतर हल्लेखोरांनी अंदाधुंद फायरिंग केली. सूत्रांच्या माहितीनुसार मशिदीत झालेल्या या स्फोटात आतापर्यंत 25 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोहाट येथे ओल्ड पोलीस लाइनजवळ एक मशिदीत हा बॉम्बस्फोट झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे असं खैबर पख्तूनख्वाचे इंस्पेक्टर जनरल (IG) जुल्फिकार हमीद यांनी सांगितलं. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटकं भरलेली एक गाडी ओल्ड पोलीस लाइनमध्ये घुसवण्यात आली. हा स्फोट कसा झाला, यामागे कोण आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. रेस्क्यू 1122 चे प्रवक्ते बिलाल अहमद फैजी यांनी सांगितलं की, स्फोटाची सूचना मिळताच टीम लगेच घटनास्थळी पोहोचली. रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं आहे.
तेहरीक ए तालिबान आणि बलूच बंडखोरांशी लढाई
पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याची ही पहिली घटना नाहीय. यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यात अनेक निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. पाकिस्तानी सैन्याची सध्या तेहरीक ए तालिबान आणि बलूच बंडखोरांशी लढाई सुरु आहे. याआधी सुद्धा या दोन संघटनांनी पाकिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. पाकिस्तानने जो दहशतवादाचा राक्षस उभा केला. आता तो त्यांच्यावरच उलटला आहे. पाकिस्तानी सैनिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडतायत.