ऑक्सफर्ड विद्यापीठात गांजा मारला, तेव्हा तालिबान… मलालाचा आजवरचा सर्वात धक्कादायक खुलासा
नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजईने तिच्या आयुष्याबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा केला. यादरम्यान तिने स्पष्ट म्हटले की, विद्यापीठात असताना आपण गांजाचे सेवन करत असत. एका रात्री गांजाचे सेवन केल्याने आपल्यासोबत काय घडले हे तिने सांगितले. आता मलालाच्या गांजाच्या खुलाशानंतर वाद निर्माण होण्याचे मोठे संकेत आहेत.

नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजईने तिच्या खासगी आयुष्याबद्दल पहिल्यांदाच अत्यंत मोठा खुलासा केला. मलालाने अंगावर काटा आणणारी घटना सांगितली. 2012 मध्ये तालिबानी बंदूकधाऱ्याने तिच्या डोक्यात गोळी झाडली होती आणि त्यानंतर काय काय घडले हे तिने सांगितले. कॉलेजमध्ये आपण पिण्याच्या पाईपाच्या मदतीने गांजाचे सेवन करत असल्याचेही तिने म्हटले. द गार्डियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना मलाला हिने म्हटले की, तिच्या शाळेच्या बसमधून घरी परतत असताना एका तालिबानी बंदूकधाऱ्याने तिच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याची नस कापली गेली, जबडा तुटला आणि कानाचा पडदा देखील फाटला.
या हल्ल्यानंतर आपल्याला तिथेच ठेवण्यात आल्याचे मलालाने म्हटले. पुढे स्थिती अधिक गंभीर होत असल्याने तिला पुढच्या उपचारासाठी ब्रिटनला नेण्यात आले. मलालाने पुढे एक भयानक अनुभव सांगत म्हटले की, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लेडी मार्गारेट हॉल कॉलेजमधील गांजाचे मी सेवन केले आणि त्या रात्रीनंतर माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. त्या रात्रीच्या अगोदर मला कधीच तो माझ्यावर झालेला हल्ला जवळून जाणवला नव्हता.
जेव्हा मी पिण्याच्या पाईपच्या मदतीने गांजाचे सेवन केले, त्यावेळी मला वाटले की, मी पुन्हा त्याच स्थितीमध्ये आहे. जणू काही मी मेले आहे. गांजाच्या सेवणानंतर मी माझ्या रूममध्ये कशी परत गेले हे देखील मला आठवते. मी बेशुद्ध पडले होते आणि माझ्या मैत्रिणींनी मला उचलून रूममध्ये नेले होते. मात्र, मला माझ्यावर गोळीबार झाल्याचे जाणवत होते आणि रुग्णवाहिकेचा आवाज कानावर पडत होता.
मलाला म्हणाली, या अनुभवाचा तिच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाला, ज्यामुळे तिला चिंता आणि पॅनीक अटॅकचा त्रास होऊ लागला. तिला यासाठी उपचार घेण्याची देखील वेळ आली. हा परिणाम इतका जास्त झाला की, तिच्या अभ्यासावरही थेट परिणाम झाला आणि कितीतरी महिने ती लढत होती आणि आतमधून पूर्णपणे तुटली होती. तुम्हाला माहिती आहे, या प्रवासात मला धाडसी असण्याचा खरा अर्थ काय आहे हे कळाले. गांझा पिल्याचा खुलासा पहिल्यांदा आताच केल्याने आपल्यावर टीकाही होऊ शकते, असे मलालाने म्हटले.
