रशिया-युक्रेनच्या युद्धात किम जोंग उन यांची एन्ट्री? उत्तर कोरियाचे 50 हजार सैनिक…

Russia Ukraine : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मोठा दावा केला आहे. रशियामध्ये उत्तर कोरियाचे 30 हजार ते 50 हजार सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रशिया-युक्रेनच्या युद्धात किम जोंग उन यांची एन्ट्री? उत्तर कोरियाचे 50 हजार सैनिक...
north korea and Russia ukraine War
Image Credit source: Google
| Updated on: Aug 09, 2026 | 7:59 PM

गेल्या 4 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मोठा दावा केला आहे. झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, रशियामध्ये उत्तर कोरियाचे 30 हजार ते 50 हजार सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांनी दक्षिण कोरियाकडे एअर डिफेन्स सिस्टीमसाठी सहकार्य वाढवण्याची मागणी केली आहे. झेलेन्स्की यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, रशियाने आपल्या हद्दीत 30 हजार ते 50 हजार उत्तर कोरियन नागरिकांना तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र झेलेन्स्की यांनी ही माहिती कोणत्या स्रोताकडून मिळाली, याचा खुलासा केलेला नाही.

वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पुढे सांगितले की, ‘युक्रेनला आपल्या हद्दीत काही उत्तर कोरियन क्षेपणास्त्रे आढळली आहेत.’ यानंतर झेलेन्स्की यांनी उत्तर कोरियाचा कट्टर दक्षिण कोरियाकडे सहकार्याचे आवाहन केले आहे. ज्या क्षेत्रांमध्ये युक्रेन कमकुवत त्या क्षेत्रांमध्ये सहकार्य हवे आहे. यावेळी झेलेन्स्की यांनी एअर डिफेन्स सिस्टीमचा उल्लेख केला. यासोबतच ड्रोन करार आणि इतर क्षेत्रांमध्येही सहकार्य करण्यास युक्रेन तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

रशिया आणि उत्तर कोरियामध्ये काय करार झाला?

जून 2024 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या प्योंगयांग दौऱ्यादरम्यान रशिया आणि उत्तर कोरियामध्ये धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या करारानुसार, कोणत्याही एका देशावर बाह्य हल्ला झाल्यास दोन्ही देश एकमेकांना मदत करतील, अशी तरतूद आहे. उत्तर कोरियाने आपल्या सैनिकांची तैनाती हा याच कराराअंतर्गत सहकार्याचा भाग असल्याचे सांगितले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये उत्तर कोरियाने रशियाच्या कुर्स्क भागात सुमारे 14 हजार सैनिक पाठवले होते. यामुळे युक्रेनियन सैन्याचे हल्ले रोखण्यासाठी रशियाला मदत मिळाली होती. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, याच महिन्यात युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर कोरियाच्या एका क्षेपणास्त्र युनिटने पश्चिम रशियामध्ये तैनाती सुरू केली आहे. या युनिटमध्ये 120 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि सहा लॉन्चर असू शकतात. ही युक्रेनसाठी धोक्याची घंटा आहे.

युक्रेनकडे एअर डिफेन्स सिस्टीमची कमतरता

युक्रेनकडे चांगल्या क्षमतेच्या एअर डिफेन्स सिस्टीमची मोठी कमतरता आहे. रशियाने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला असून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर वाढवला आहे. कारण ही क्षेपणास्त्रे पाडणे तुलनेने कठीण असते. तसेच उत्तर कोरियाने रशियाला लाखो आर्टिलरी आणि मोर्टार गोळे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याच्या तोफा आणि मल्टिपल-लॉन्च रॉकेट सिस्टीमचा पुरवठा केला आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाचा सहभाग वाढत असल्याचे समोर आले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us