व्हेनेझुएलासोबत ट्रम्प काय करणार? अमेरिकेचा कट अगोदरच माहीत होता पण… खळबळजनक माहिती समोर!
US Attack on Venezuela : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण जगात अमेरिकेच्या या कारवाईची चर्चा रंगली आहे. अशातच आता हा हल्ला होणार याची माहिती दोन वृत्तपत्रांना होती अशी माहिती समोर आली आहे.

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता असणार आहे. मादुरोनंतरचा व्हेनेझुएला कसा असेल हे आता अमेरिका ठरवेल. अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल उद्योगात सहभाग घेणार आहे अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. सध्या संपूर्ण जगात अमेरिकेच्या या कारवाईची चर्चा रंगली आहे. अशातच आता हा हल्ला होणार याची माहिती दोन वृत्तपत्रांना होती अशी माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेचा कट माहीत होता पण…
अमेरिकेने व्हेनेझुएलातील लष्करी कारवाई सुरू करण्यापूर्वी अमेरिकेतील दोन प्रमुख वृत्तपत्रे, द न्यू यॉर्क टाईम्स आणि द वॉशिंग्टन पोस्ट यांना याबाबत माहिती मिळालेली होती. मात्र दोन्ही वृत्तपत्रांनी अमेरिकन सैन्याच्या सुरक्षेचा हवाला देत ही माहिती प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन वेबसाइट www.semafor.com ने आपल्या बातमीत म्हटले की, या कारवाईपूर्वी दोन्ही वृत्तपत्रांच्या वरिष्ठ संपादकांना माहिती देण्यात आली होती. मात्र अंतर्गत विचारविनिमयानंतर दोन्ही वृत्तपत्रांनी या कारवाईत सहभागी असलेल्या अमेरिकन सैन्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून याबाबत बातमी देण्याचे टाळले असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही वृत्तपत्रांनी घेतलेला हा निर्णय अमेरिकन पत्रकारितेच्या परंपरेचे प्रतिबिंब आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत जेव्हा सैनिकांचा जीव धोक्यात असतो तेव्हा संयम बाळगणे गरजेचे असल्याचे दर्शवितो. गेल्या काही काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माध्यमांमधील संबंध ताणलेले आहेत, यात काळात वृत्तपत्रांनी उचललेले हे पाऊल आणखी महत्त्वाचे मानले जात आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ‘आमच्या सैन्याने व्हेनेझुएलामध्ये लष्करी कारवाई केली. मोठी लष्करी शक्ती, हवाईमार्ग, जमीनीचा आणि समुद्राचा वापर करून हा हल्ला करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर कधीही न पाहिलेला हा हल्ला होता. अमेरिकन इतिहासातील अमेरिकन लष्करी शक्ती आणि क्षमतेचे हे सर्वात शक्तिशाली प्रदर्शन होते.’ या कारवाई नंतर अमेरिकेने समुद्रमार्गे येणारे 97% ड्रग्ज नष्ट केले आहेत असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता मादुरो यांच्यावर अमेरिकेत खटला चालवला जाणार आहे.
