सर्वात मोठी बातमी ! व्हेनेझुएलावर आता अमेरिकेची सत्ता, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
Venezuela : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. त्यानंतर आता व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता आहे. मादुरोनंतरचा व्हेनेझुएला कसा असेल हे आता अमेरिका ठरवेल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. यानंतर आता काही तासांतच, डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, ‘व्हेनेझुएलावर आता अमेरिकेची सत्ता आहे. मादुरोनंतरचा व्हेनेझुएला कसा असेल हे आता अमेरिका ठरवेल. अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल उद्योगात सहभाग घेणार आहे. आमच्याकडे जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्या आहेत.’ याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता
व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘व्हेनेझुएलातील कारवाई माझ्या आदेशावरून करण्यात आली होती. ही कारवाई एका हुकूमशहाला हटवण्यासाठी होती. मादुरो एक हुकूमशहा आहे. या कारवाईत कोणीही मारले गेले नाही. एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नाही. आम्हाला व्हेनेझुएलामध्ये शांतता हवी आहे. व्हेनेझुएला आता आमच्या नियंत्रणाखाली आहे. तिथे अमेरिकन राजवट आहे.’
दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ‘काल रात्री उशिरा आणि आज सकाळी, माझ्या आदेशानुसार, आमच्या सैन्याने व्हेनेझुएलामध्ये लष्करी कारवाई केली. मोठी लष्करी शक्ती, हवाईमार्ग, जमीनीचा आणि समुद्राचा वापर करून हा हल्ला करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर कधीही न पाहिलेला हा हल्ला होता. अमेरिकन इतिहासातील अमेरिकन लष्करी शक्ती आणि क्षमतेचे हे सर्वात शक्तिशाली प्रदर्शन होते.’ या कारवाई नंतर अमेरिकेने समुद्रमार्गे येणारे 97% ड्रग्ज नष्ट केले आहेत असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
व्हेनेझुएलाचा तेल व्यापार अपयशी
डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, ‘व्हेनेझुएलातील तेल व्यवसाय अपयशी ठरला आहे. आता मोठ्या अमेरिकन कंपन्या तिथे जातील, अब्जावधी डॉलर्स खर्च करतील आणि तेलाच्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती करतील. गरज पडल्यास, अमेरिका व्हेनेझुएलावर आणखी मोठा हल्ला करण्यास तयार आहे. मात्र आता त्याची आवश्यकता भासणार नाही. अमेरिकेने इतक्या कमी वेळात जे साध्य केले, ते जगातील कोणताही देश हे करू शकत नाही. आता कोणीही अमेरिकेला आव्हान देऊ शकत नाही. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यू यॉर्कला आणले जात आहे. आता, त्यांच्यावर अमेरिकेत खटला चालवला जाईल.’
