Pakistan Inflation : भारताच्या शत्रूराष्ट्रात महागाईचा प्रचंड भडका, गॅस सलिंडर थेट 7000 रुपयांवर; पाकिस्तानच्या एका निर्णयाने सगळं उद्ध्वस्त!
पाकिस्तानने इराणसोबतची आपली सीमा बंद केल्याने इराणमधून येणारा एलपीजी पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर नवे संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तानात 12 किलो एलपीजी सिलिंडरचा भाव 4500 रुपये होता.

Pakistan Price Hike : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ संपूर्ण जग सोसते आहेत. या दोन्ही देशांत समेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु आता इराणमुळे पाकिस्तानला जबर धक्का बसला आहे. पाकिस्तानने इराणची सीमा बंद केली. त्यामुळे इराणला फटका बसण्याऐवजी आता पाकिस्तानच या निर्णयामुळे होरपळून निघाला आहे. अगोदरच महागाईचे चटके सोसत असलेल्या पाकिस्तानात आता महागाईचा थेट भडकाच उडालाय. येथे घरगुती गॅस सिलिंडरचा भाव थेट 7000 रुपयांपर्यंत (पाकिस्तानी रुपया) वाढलाय.
पाकिस्तानने नेमका काय निर्णय घेतला?
पाकिस्तानने 17 ऑक्टोबर रोजी इराणलगतची सीमा बंद केली. गबद-रिमदान आणि तफ्तान सीमेवरील व्यापार रोखण्यात आला. या निर्णयानंतर देशांतर्गत सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी तसेच तस्करी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. तर तांत्रिक कारणामुळे ही सीमा बंद करण्यात आली असे इराणकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही देशांनी दिलेली कारणं वेगवेगळी आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि इराण यांच्यातील सीमा नेमकी का बंद करण्यात आली याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. परंतु या निर्णयामुळे पाकिस्तानातील बटाटे, केळी, तांदुळ यांनी भरलेले एक हजारपेक्षा जास्त कंटेनर मध्येच फसले आहेत. शेकडो ट्रकांची वाहतूक प्रभावित झालीय. गबद-रिमदान मार्गावर जे सामान खराब होणारे आहे, त्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली. परंतु एलपीजी गॅसची वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही.
पाकिस्तानात महागाईचा भडका कसा उडाला?
पाकिस्तानने इराणसोबतची आपली सीमा बंद केल्याने इराणमधून येणारा एलपीजी पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर नवे संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तानात 12 किलो एलपीजी सिलिंडरचा भाव 4500 रुपये होता. आता हाच भाव 7000 रुपये (पाकिस्तानी रुपये) एवढा वाढला आहे. इराणकडून होणारा एलपीजीचा पुरवठा असाच बंद राहिला तर भविष्यात ही महागाई आणखी वाढू शकते, अशी शंका व्यक्त केली जाते. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान इराणकडून दररोज 7000 टन एलपीजी आयात करतो. सीमा बंद असल्याने आता हा पुरवठा कायमचा थांबला आहे.
