होर्मुजमध्ये 4 तेलवाहू जहाज उडवली, इराणचा मोठा दावा; जगभरात खळबळ
पर्शियन आखातात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने चार तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली. होर्मुज स्ट्रेटजवळ इतर तीन जहाजांना माइन्सची धडक लागून मोठे नुकसान झाले. इराणने अमेरिकेवर सागरी मार्गांवर चुकीच्या मार्गाने जहाजे पाठवण्याचा आरोप करत, जर हे थांबले नाही तर अमेरिकन तळांवर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर इशारा दिला आहे.

पर्शियन आखातात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)च्या नौदलाने उत्तर पर्शियन आखातामध्ये नियमांकडे दुर्लक्ष केलं म्हणून चार तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. त्याशिवाय होर्मुज स्ट्रेटच्या पश्चिमेला खदानींना धडक दिल्याने तीन इतर जहाजांना मोठं नुकसान झालं आहे. इराणच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. इराणची वृत्तसंस्था मेहर न्यूजनेही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. आयआरजीसी नौदलाच्या दाव्यानुसार, उत्तर पर्शियन आखातात ही जहाजं नियमांचं उल्लंघन करत कच्च्या तेलाच्या मालाची एका जहाजातून दुसरीकडे वाहतूक करत होते. त्यामुळे कारवाई करताना या जहाजांवर हल्ला करण्यात आला. यावेळी जहाजांना भीषण आग लागली, असं या वृत्त संस्थेने म्हटलं आहे.
आयआरजीसीच्या नौदलाच्या मते, या शिवाय इतर तीन जहाजांनी रात्रीच्यावेळी होर्मुज स्ट्रेटच्या पश्चिमेला माइन्सला धडक दिली. त्यामुळे या तीन जहाजांचं मोठं नुकसान झालं आहे. ही धडक अत्यंत भीषण होती. त्यामुळे जहाजांवर स्फोट झाले आणि जहाजांना प्रचंड आग लागली. भर समुद्रातच हे अग्नितांडव निर्माण झालं. त्यामुळे ही तीन मालवाहतूक जहाज पुढे सरकू शकले नाही.
मेहर न्यूजच्या मते, आयआरजीसी नौदलाच्या दाव्यानुसार, इराणी जनतेचं दृढ समर्थन देशाच्या सैन्य ताकदीला मजबुती देतं. त्यामुळे विरोधकांना नैराश्य येतं. जनतेच्या या व्यापक समर्थनामुळे आणि विश्वासामुळेच आमचं नौदल होर्मुज स्ट्रेटवर देखरेख आणि नियंत्रण ठेवून आहे. अमेरिकन सैन्याने दिशाभूल केलेल्या आणि बेकायदेशीरपणे सागरी मार्गांचा वापर करणाऱ्या शिपिंग कंपन्यांना आम्ही या आधीच इशारा दिला होता. त्यानंतरही नियमांचं उल्लंघन करणं सुरूच आहे, असंही नौदलाने म्हटलं आहे,
तर अमेरिकन तळांवर हल्ला
आयआरजीसीने यावेळी अमेरिकेवरही टीकास्त्र सोडलं आहे. अमेरिका प्रशासन सातत्याने माइन्सचं जाळं असलेल्या सागरी मार्गावरून बेकायदेशीरपणे जहाजांना जाण्यासाठी उकसवत आहे. त्यामुळे सागरी घडामोडींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर याचा परिणाम परिसरातील अमेरिकेच्या सैन्य तळांपर्यंत पोहोचू शकतो, असा इशारा आयआरजीसीने दिला आहे. अमेरिकेसाठी हा आमचा गंभीर इशारा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
1500 जहाजे अडकली
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे आखातात सुमारे 1500 जहाजे आणि त्यांवरील कर्मचारी अडकले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे (IMO) महासचिव यांनी गुरुवारी पनामा येथे दिली. 28 फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धानंतर मध्यपूर्वेत संघर्ष तीव्र झाला होता. इराणने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना विविध भागांत कारवाया केल्या असून, जागतिक व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीवरही निर्बंध आले आहेत.
