
गेल्या 3 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. अशातच आता युक्रेनच्या हवाई दलाने सोमवारी सांगितले की, रशियाने मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियाने बॉम्बस्फोटासाठी ४७९ ड्रोनचा वापर केला आहे. तसेच युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात विविध प्रकारच्या २० क्षेपणास्त्रांद्वारेही हल्ला केला अशी माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
युक्रेनियन हवाई दलाने या हल्ल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यात रशियाने युक्रेनच्या मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेशांना लक्ष्य केले. रशियाने डागलेल्या ४७९ ड्रोनपैकी युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने २७७ ड्रोन आणि १९ क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे बरेच ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत असं युक्रेनियन सैन्याने म्हटलं आहे.
हल्ल्यानंतर इमारतींना लागली आग
रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या कीव आणि इतर शहरांमधील इमारतींना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही आग विझविण्यासाठी युक्रेनियन आपत्कालीन सेवांना रात्रभर कष्ट करावे लागल्याची माहितीही समोर आली आहे.
आतापर्यंत १२ हजार नागरिकांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, रशियाचे हवाई हल्ले रात्री सुरू होतात आणि सकाळी संपतात, कारण अंधारात ड्रोन ओळखणे आणि पाडणे कठीण असते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धादरम्यान रशियाने ड्रोनच्या मदतीने युक्रेनच्या नागरी भागांवर वारंवार हल्ला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, या युद्धात आतापर्यंत १२,००० हून अधिक युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र रशियाने आम्ही नागरी वस्त्यांवर नव्हे तर फक्त लष्करी तळांवर हल्ला केला असल्याचे म्हटले आहे.
युद्धाला नवीन वळण लागण्याची शक्यता
रशियाचा हा हल्ला या युद्धाला नवीन वळण देण्याची शक्यता आहे. या मुळे दोन्ही देशांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात आता हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रशियाची लष्करी क्षमता वाढलेली आहे, मात्र युक्रेनची सेना मर्यादित आहे. यामुळे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला अधिक मदतीसाठी आवाहन केले आहे.