काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला सौदी अरेबियाचा मोठा धक्का

| Updated on: Apr 08, 2024 | 7:49 PM

पाकिस्तान नेहमीच आपले अंतर्गत विषय सोडून काश्मीरचा मुद्दा काढत असतो. मुस्लीम देशांना काश्मीरच्या मुद्द्यावर एकत्र येऊन भारतावर दबाव आणला पाहिजे अशी त्याची भूमिका आहे. पण त्याला कोणत्याच मुस्लीम देशांकडून पाठिंबा मिळत नाही.

काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला सौदी अरेबियाचा मोठा धक्का
SAUDI PRINCE
Follow us on

रियाध : काश्मीरच्या मुद्द्यावरून सौदी अरेबियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तान नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत असतो. पण त्याला एखादा देश सोडला तर कोणत्याच देशाकडून समर्थन मिळत नाही. आता सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानला चर्चेतून हा प्रश्न सोडवावा लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या रियाध दौऱ्यादरम्यान क्राउन प्रिन्स यांचे हे वक्तव्य आले आहे.

संयुक्त राज्यात काश्मीरचा मुद्दा

पाकिस्तान काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रात देखील प्रश्न उपस्थित करतो. पण इतर देशांनी आतापर्यंत अनेक वेळा यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.भारत या मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चेला सुरुवातीपासून पाठिंबा देत आला आहे. दहशतवादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये कुठलीच चर्चा होत नाहीये.

सौदी अरेबियाने काय म्हटले

सौदी अरेबियाने संयुक्त निवेदनात म्हटले की, दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्य राखत वादाचे निराकरण केले पाहिजे. जम्मू आणि काश्मीर वादाचे निराकरण करण्यासाठी पाकिस्तान आणि भारत यांनी चर्चेला महत्त्व द्यावे असे ही ते म्हणाले आहेत. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि शेहबाज शरीफ यांच्या भेटीत सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, शेहबाज शरीफ आणि मोहम्मद बिन सलमान अल सौद यांची मक्का अल-मुकर्रमा येथील अल-साफा पॅलेसमध्ये 7 एप्रिल 2024 रोजी अधिकृत बैठक झाली.

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

संयुक्त निवेदनाच्या सुरुवातीला, क्राउन प्रिन्स यांनी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. शेहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाच्या दृढ समर्थन आणि आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि द्विपक्षीय संबंध आणि आर्थिक सहकार्याला चालना देण्याच्या पाकिस्तानच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुलवामा हल्ल्यानंतर संबंध अधिक ताणले गेले आहेत. दोन्ही देशांच्या व्यापारावर याचा मोठा परिणाम झाला आहे. भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला जागतिक पातळीवर उघडे पाडले आहे. दहशतवादाला सोडून चर्चा होऊच शकत नाही अशी भारताची भूमिका आहे.